– कुलगुरूंच्या उपस्थितीत भंडारा येथे नियोजन बैठक
नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिक्षेत्रात मंडईचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या उपस्थितीत भंडारा येथील जे. एम. पटेल महाविद्यालयात शनिवार, दिनांक ११ नोव्हेंबर २०२३ रोजी नियोजन बैठक पार पडली. यावेळी आंतरविद्याशाखीय विद्या शाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. कार्तिक फणीकर उपस्थित होते.
शताब्दी महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ‘रिचिंग टू अनरीच्ड’ उपक्रम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ राबवित आहे. शिक्षणासोबतच विद्यापीठ परिक्षेत्रात सामाजिक व आर्थिक परिवर्तन व्हावे म्हणून कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. भंडारा येथील जे एम पटेल महाविद्यालयात झालेल्या नियोजन बैठकीला परिसरातील २४ सरपंचांची उपस्थिती होती. बैठकीत मंडळी कार्यक्रमाबाबत माहिती देताना कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी या उपक्रमा मागील भूमिका सांगितली. मंडईच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरातील लोक एकत्रित येतात. सामाजिक व आर्थिक परिवर्तनाची भूमिका मंडई कार्यक्रमाच्या माध्यमातून जनमानसात पोहोचवण्यासाठी विद्यापीठ काय करू शकते याबाबत कुलगुरूंनी माहिती दिली. सोबतच गावामध्ये होणाऱ्या प्रत्येक मंडईच्या दोन गटांना पुरस्कार देखील दिले जाणार असल्याचे कुलगुरूंनी सांगितले. प्रथम येणाऱ्या गटाला १० हजार रुपये तर द्वितीय गटाला ५ हजार रुपयांचा पुरस्कार दिला जाणार असल्याचे ते म्हणाले. मंडई कार्यक्रमांमध्ये सरपंच काय भूमिका बजावू शकतात. विद्यापीठाचा हा उपक्रम स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून सरपंचांकडून कुलगुरूंनी माहिती घेतली.
विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाकडून राबविल्या जात असलेल्या विविध कौशल्य अभ्यासक्रमाची माहिती यावेळी सरपंचांना देण्यात आली. या कौशल्य अभ्यासक्रमाच्या माध्यमातून स्वयंरोजगार व रोजगाराची निर्मिती गावांमध्ये कशी केली जाऊ शकते. रोजगार निर्मितीत विद्यापीठ मदत करणार असून लोकांना प्रशिक्षणापासून प्रकल्प अहवाल त्याचप्रमाणे प्रकल्प सुरू होईपर्यंत मदत करण्याची विद्यापीठाची भूमिका असल्याचे कुलगुरूंनी सांगितले. महिला बचत गटांना या उपक्रमात सहभागी करण्याची विनंती बैठकीमध्ये महिला सरपंचांनी केली. सोबतच पर्यटन व्यवसायाला चालना देण्याबाबत सरपंचांनी मत व्यक्त केले. कुलगुरू डॉ. चौधरी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत विविध गावातील २४ सरपंचांसोबत सकारात्मक चर्चा झाली.