संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- मागील काही दिवसांत कामठी तालुक्यात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.दरम्यान मागील महिन्यात 27 व 28 नोव्हेंबर ला अवकाळी पावसाने कामठी तालुक्याला चांगलाच फटका दिला. यावेळी पाण्यात धानपिक सापडल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.यामुळे हाती आलेला उत्पादन हिरावल्याचे दिसून येत आहे.परिणामी येथील संबंधित प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी नेता व माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी केली आहे.
शेती व्यवसाय करताना शेतकरी चांगलाच भरडला जात आहे.आस्मानी संकट व निसर्गाचा लहरीपणा उत्पादनावर परिणाम करीत आहे.परिणामी दिवसेंदिवस शेती करणे तोट्याचे होत आहे.असे असले तरी वर्षभर कष्ट करूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच लागत आहे.
28 नोव्हेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसाने शेत पिकाचे प्रचंड नुकसान केले.शेतकऱ्यानी शेतात ठेवलेले धान पाण्यात सापडले तसेच शेतातील उभे धान पाण्याने जमीनदोस्त झाले. यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला.दरवर्षीच काही ना काही संकट शेतकऱ्यावर येत असतात .यावर्षी 28 नोव्हेंबर ला आलेल्या अवकाळी पावसामुळे धानाची पोत ओली झाली तर कोणताही व्यापारी ओले झालेले धान घेणार नाही कारण तांदूळ लाल होतात म्हणजे आजच्या स्थितीत शेतकऱ्यांची स्थिती हाती उत्पन्न येऊनही कपाळावर हात ठेवून रडत बसण्याची पाळी शेतकरी बांधवावर येऊन पडली आहे.हीच परिस्थिती भाजीपाला व रब्बी पीक लावलेल्या शेतकऱ्यांची आहे . यामुळे वेळ वाया जाऊ न देता प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करून पंचनामे करावे व शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी केले आहे.