यवतमाळ :- दिग्रस, दारव्हा, नेर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (आ.), पिरिपा, लहुजी शक्ती सेना व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार संजय राठोड हे उद्या २४ ऑक्टोबर रोजी नामांकन अर्ज दाखल करणार आहेत.
दारव्हा उपविभागीय कार्यालयात नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी सकाळी १० वाजता दारव्हा येथील झाशी राणी चौकातील गुल्हाने मैदानात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत महायुतीचे नेते, पदाधिकारी यांच्यासह दिग्रस, दारव्हा, नेर या तिन्ही तालुक्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. सभेनंतर रॅली काढण्यात येवून संजय राठोड हे समर्थकांसह नामांकन अर्ज दाखल करणार आहेत.
२००४ मध्ये तत्कालीन दारव्हा विधानसभा मतदारसंघात संजय राठोड हे काँग्रेस उमेदवाराला पराभूत करून पहिल्यांदा विजयी झाले होते. त्या नंतर २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये दिग्रस विधानसभा मतदारसंघातील जनेतेने विश्वास दाखवत मतरूपी आशीर्वाद देत संजय राठोड यांना प्रचंड मताधिक्याने सलग विजयी केले. यावेळी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या गुरूवारी आयोजित सभेस व रॅलीत समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.