महाराष्ट्राचा सुवर्ण षटकार, ॲथलेटिक्समध्ये पदकांची लयलूट

– बॅडमिंटनमध्ये आरतीचे अपेक्षित सुवर्ण

– पॉवरलिफ्टिंगमध्ये दोन रौप्य, एक ब्राँझपदक

नवी दिल्ली :- पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पात्रता सिद्ध केलेल्या दिलीप गावितसह भाग्यश्री जाधव, अभिषेक जाधव, अकुताई उलभगत, गीता चव्हाण आणि बॅडमिंटनपटू आरती पाटील यांनी पहिल्या खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेत मंगळवारी सुवर्णपदकांची कमाई केली. या सुवर्ण षटकाराने महाराष्ट्राने आपली सर्वसाधारण आगेकूचही कायम राखली. त्यानंतर पॉवरलिफ्टिंगमध्येही महाराष्ट्राच्या मोहिमेला यशस्वी सुरुवात झाली.

ॲथलेटिक्स पाठोपाठ पॉवर वेटलिफ्टिंग प्रकारातही खेळाडूंनी महाराष्ट्राच्या पदकांचा भार उचलला. पहिल्या दिवशी महाराष्ट्राने दोन रौप्य आणि एका ब्राँझपदकाची कमाई केली.

खेळाडूंचा उत्साह आणि त्यांची जिंकण्याची जिद्द पाहिल्यावर धडधाकट खेळाडू देखिल प्रेरित होतील अशी कामगिरी हे खेळाडू करत आहेत. पुण्याच्या मिनाक्षी जाधवने एकाच दिवशी दोन ब्राँझपदकांची कमाई केली. पहिल्या दिवशी २०० मीटर शर्यतीत तिसरे स्थान मिळविणाऱ्या ऋतुजाने आज टू -३८/४४ प्रकारात ४०० मीर शर्यतीतही ब्राँझपदक मिळविले.

भाग्यश्री दिलीप आणि गीता यांच्या सुरेख कामगिरीमुळे महाराष्ट्राने ॲथलेटिक्समध्ये आज दिवसभरात आठ पदकांची कमाई केली. नाशिकच्या दिलीपने पुरुषांच्या टी ४७ प्रकारात ४०० मीटर शर्यत जिंकताना ५१.२२ सेकंद अशी वेळ दिली. स्पर्धेतील हे त्याचे दुसरे पदक ठरले. यापूर्वी पहिल्या दिवशी तो १०० मीटर शर्यतीत रौप्यपदकाचा मानकरी ठरला होता. अभिषेकने टी ३५ प्रकारातून २०० मीटर शर्यत २९.९२ सेकंदात जिंकताना सुवर्णयश मिळविले.

*भाग्यश्री चमकली*

ॲथलेटिक्समध्ये भाग्यश्रीचे यश सर्वात उजवे ठरले. सलग दुसऱ्या दिवशी भाग्यश्रीने सुवर्णपदकाला गवसणी घातली. नांदेडच्या भाग्यश्रीने महिलांच्या गोळाफेक प्रकारात एफ ३२, ३३, ३४ विभागात ७.६० मीटर फेक करताना सुवर्णपदक मिळविले. भाग्यश्री पहिल्या दिवशी भालाफेक प्रकारातही सुवर्णपदकाची मानकरी ठरली होती. हे यश अवर्णनीय असून, भविष्यात कारकिर्द घडवताना हा सुवर्ण अनुभव निश्चित कामी येईल, असे भाग्यश्री म्हणाली.

अकुताईने थाळीफेक प्रकारात रौप्यपदक मिळविले होते. मात्र, आज गुणांच्या आघाडीची पडताळणी झाल्यावर अकुताईचे रुपेरी यश सोन्यात परावर्तित झाले. मिनाक्षीने एफ ५६-५७ या प्रकारात फेक प्रकारात लागोपाठ दोन ब्राँझपदके मिळविली. प्रथम भालाफेक प्रकारात मिनाक्षीने १२.३५ मीटर फेक केली, तर गोळाफेक प्रकारात तिने ५.१६ मीटर फेक करून तिसरे स्थान मिळविले.

*नेत्रदिपक कामगिरी – सुहास दिवसे*

आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव पणाला लावताना खेळाडूंनी पहिल्या पॅरा खेलो इंडिया स्पर्धेत केलेली कामगिरी विलक्षण असून, त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. खेळाडूंच्या कामगिरीने महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. अन्य खेलो इंडिया स्पर्धेतील महाराष्ट्राचे यश या पॅरा खेळाडूंच्या यशाने द्विगुणित झाले, अशा शब्दात क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांनी महाराष्ट्राच्या खेळाडूंचे कौतुक केले.

*आरती पाटीलचे अपेक्षित सुवर्ण यश*

बॅडमिंटनमध्ये महाराष्ट्राच्या आरती पाटीलने एसयु ५ प्रकारात अपेक्षित सुवर्णपदक मिळविले. अंतिम फेरीच्या लढतीत आरतीने हरियानाच्या लतिकाचा तीन गेमच्या संघर्षपूर्ण लढतीत २१-१५, २२-२०, २१-८ असा पराभव केला. पहिला गेम गमाविल्यानंतरही आरतीने नंतर कमालीच्या संयमाने सामन्यावर नियंत्रण राखून खेळ केला आणि योग्य वेळी आक्रमक होत आरतीने विजयाला गवसणी घातली.

एसएल ४ प्रकारात महाराष्ट्राच्या डॉ. जितेश राठीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम लढतीत राजस्थानच्या प्रणय सेठने जितेशचा २१-१२, २१-१० असा पराभव केला.

*पॉवरलिफ्टिंग खेळाडूंनीही दाखवली ताकद*

ॲथलेटिक्स पाठोपाठ पॉवर वेटलिफ्टिंग प्रकारातही खेळाडूंनी महाराष्ट्राच्या पदकांचा भार उचलला. पहिल्या दिवशी महाराष्ट्राने दोन रौप्य आणि एका कांस्यपदकाची कमाई केली.

पॉवरलिफ्टिंग प्रकारात महाराष्ट्राच्या पदकाची सुरुवात शुक्ला सतप्पा बिडकरने केली. तिने ४१ किलो वजन गटातून ५० किलो वजन उचलून रौप्यपदक मिळविले. पंजाबची मनप्रीत कौर (८५ किलो) सुवर्ण, तर गुजरातची नयना पाबरी (४७) ब्राँझपदकाची मानकरी ठरली. त्यानंतर ४५ किलो वजनी गटात महाराष्ट्राची सोनम धोंडीराम पाटील ४० किलो वजन उचलून ब्राँझपदकाची मानकरी ठरली. पंजाबची जसप्रीत कौर (८५ किलो) आणि गुजरातची सपना शहा (४७ किलो) अनुक्रमे सुवर्ण, रौप्यपदकाच्या मानकरी ठरल्या. महिलांच्या ५० किलो वजनी गटात महाराष्ट्राची प्रतिमाकुमारी बोंडे(८०किलो) रौप्यपदकाची मानकरी ठरली. कर्नाटकाच्या सकिना खातूनने ९६ किलो वजन उचलताना सुवर्ण,तर उत्तर प्रदेशाच्या सायराने ब्राँझपदक मिळविले.

स्पर्धेच्या पुरुषांच्या ४९ किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या देविदास झिटेला (७० किलो) चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. येथेही सुवर्ण पंजाबलाच गेले. परमजीत कुमारने १५० किलो वजनी उचलून सोनेरी यश मिळविले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Mumbai Traffic Woes !

Wed Dec 13 , 2023
I don’t know what the hell is Mumbai Traffic Department doing? I don’t know what the hell is the Government doing? I don’t know what the hell are MLAs, ex-corporators doing of my city? I don’t know why the hell, my city’s main and arterial road is dug up every second day? I don’t know the answers. When the entire […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com