– बसमध्ये ‘व्हेहिकल ट्रॅकिंग सिस्टीम’ यंत्रणा कार्यान्वित, प्रवाशांसाठी बसस्थानकावर स्क्रिन
नागपूर :- वेळेत बस आली नाही तसेच ती किती वेळात येणार याची खात्री लायक माहिती मिळाली नाही की प्रवासी अस्वस्थ होतात. वेळ घालविता येत नाही आणि अस्वस्थता वाढते. आता मात्र, अस्वस्थ होण्याचे कारण नाही. नागपूर विभागातील सर्वच बसमध्ये ‘व्हेहिकल ट्रॅकिंग सिस्टीम’ (व्हीटीएस) कार्यान्वित करण्यात आली असून बस स्थानकावर मोठ्या स्क्रिन लावण्यात आल्या आहेत. या माध्यमातून बसची नियोजित आणि अपेक्षित वेळ समजते. सध्या अॅपवर काम सुरू आहे. अॅप डाउनलोड करताच प्रवाशांच्या मोबाईलव्दारे एसटीचे लोकेशन घेता येईल.
एसटी महामंडळाच्या नागपूर विभागातील 453 प्रवासी बसेसह मालवाहतूक बसमध्येही व्हीटीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून कार्यालयीन कर्मचारी सध्याच्या बसचे लोकेशन घेतात. नागपूर विभागाने प्रवाशांच्या सोयीसाठी गणेशपेठ बस स्थानकावर 3 स्क्रिन बसविल्या आहेत. तसेच मोरभवन-1, कामठी-1, कोंढाळी-1, काटोल-2, रामटेक-2 आणि उमरेड बसस्थानकावर 1 अशी एकूण 12 स्क्रिन बसविण्यात आल्या. बसच्या प्रतिक्षेत असलेले प्रवासी या स्क्रिनवर नियोजित आणि अपेक्षित वेळ पाहू शकतात. म्हणजे बसची नियोजित वेळ आणि किती वेळात पोहोचेल. याशिवाय बस फेर्याची सुध्दा माहिती या स्क्रिनवर पाहायला मिळते.
सध्या नागपूर विभागातर्फे (एमएसआरटीसी) अॅप बसविण्याचे काम सुरू आहे. यानंतर प्रवाशांना एसटीचा ठावठिकाणा मोबाइलद्वारे समजणार आहे. आपली एसटी बस कुठे आहे, किती वेळात स्थानकात पोहोचेल, अपघात झाल्यावर तातडीने मदत कशी उपलब्ध होईल, बिघाडाची माहिती कशी द्यायची. या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रवाशांना मोबाइलद्वारे मिळणार आहेत. प्रवाशांच्या भविष्यातील गरजा ओळखून तंत्रज्ञानाच्या मदतीने एसटी सेवांमध्ये प्रवाशांच्या हिताचे बदल करण्यात येत आहे.
अभिप्राय देण्याची सुविधा अॅपमध्ये
जवळचे बस स्थानक, बसमार्ग, प्रवासी माहिती प्रणाली, बस थांबा, ऑनलाइन अभिप्राय देण्याची सुविधा अॅपमध्ये आहे. प्रवाशांच्या तक्रारींमध्ये अधिक स्पष्टता येण्यासाठी ‘वाहक-चालक’, ‘बसस्थिती’, ‘बससेवा’, ‘ड्रायव्हिंग’, ‘मोबाइल अॅप’ असे वर्गीकरण करण्यात आले आहे. प्रवाशांनी संबंधित विषयाबाबत तक्रार देताना मोबाइल क्रमांक आणि वाहन क्रमांक ऑनलाइन नोंदवावा लागणार आहे.
मदतीसाठी अॅपमध्ये सुविधा
महिला सुरक्षितता, मार्गस्थ बिघाड, वैद्यकीय मदत आणि अपघात या आणीबाणीच्या वेळी प्रवाशांना मदतीसाठी अॅपमध्ये सुविधा देण्यात आलेली आहे. एसटी नियंत्रण कक्ष, पोलिस, रुग्णवाहिका यांना थेट अॅपमधून फोन करण्याची सुविधा आहे.
@ फाईल फोटो