सावनेर/खापा – तालुक्यातील खापा (कन्हान) नदीपात्रातून व खैरी नाल्यातून अवैध्यरीत्या रेतीचे उत्खन करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणच्या पथकाने धाड टाकली. यावेळी 130 ब्रास रेती साठा जप्त करण्यात आला आहे. या अवैध रेतीसाठ्यातून शासनाला लाखो रुपयांचा चुना लावला जात होता. या कारवाईमुळे अवैध रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्याचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण यांनी दिलेल्या आदेशावरून अवैध रेतीचा साठयावर कारवाई करणेकामी स्थानिक गुन्हे शाखेतील पथक हे सावनेर उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना पोस्टे खापा हद्दीतील पंजाबराव खैर गावाजवळ असलेला खैरी नाल्या जवळ खुल्या जागेत सार्वजनिक ठिकाणी अवैधरीत्या विनापरवाना रेतीसाठा आहे. अशा मिळालेल्या गोपनीय खबरेवरून दिनांक २१/०६/२०२३ रोजी १३.०० वा. दरम्यान खैरी नाल्याजवळ जागोजागी खुल्या जागेत लावारीसरीत्या रेतीचा साठा दिसुन आला.
नमुद घटनास्थळी रेड टाकुन अवैध रेतीच्या साठ्यावर कारवाई करून एकुण १३० ब्रास रेती गौणखनिज साठा प्रत्येकी ब्रॉस रेती २६००/- रु. प्रमाणे असा एकुण किमती अंदाजे ३,३८,००० /- रूपयाचा मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली. नमुद अवैधरीत्या विनापरवाना रेती (गौणखनिज) चा साठयावर आळा घालून दंडात्मक कार्यवाही करण्याकरीता मा. तहसिलदार सावनेर यांना पत्रव्यवहार करण्यात आला.
सदरची कार्यवाही नागपुर ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, पोलीस हवालदार राजेश रेवतकर, पोलीस नायक किशोर वानखेडे, आशिष मुंगळे, उमेश फुलबेल यांचे पथकाने पार पाडली.