चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात कुष्ठरुग्ण शोध मोहीम व सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम जिल्ह्यात १३ ते ३० सप्टेंबर २०२२ दरम्यान राबविण्यात येत असून यासाठी आवश्यक ते नियोजन चंद्रपूर शहर महानगरपालिकेद्वारा करण्यात आले आहे.
या मोहिमेत मनपा क्षेत्रातील सातही प्राथमिक आरोग्य केंद्र क्षेत्रातील अति जोखीमग्रस्त भागातील २३,९९८ घरांतील १,०३,८२९ नागरीकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्व नागरीकांची कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत शारीरिक तपासणी करण्यात येणार आहे. मोहिमेकरीता दोन सदस्यांचे एक पथक राहणार आहे. या पथकामध्ये आशा सेविका व पुरुष स्वयंसेवक असणार आहे. हे पथक कुटूंबातील व्यक्तींची तपासणी करणार असून रोगाची लक्षणे आहेत किंवा नाही याबाबत तपासणी करणार आहेत.
अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांच्या नेतृत्वात व मनपा आरोग्य विभाग प्रमुख डॉ. वनिता गर्गेलवार यांच्या प्रत्यक्ष नियोजनात मोहीमेस सुरवात होत असुन प्रत्येक टीममार्फत त्यांना नेमुन दिलेल्या कार्यक्षेत्रातील जोखीमग्रस्त भागांमध्ये ३० घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. घरातील महीला सदस्यांची तपासणी आशा वर्कर तर पुरुष सदस्यांची तपासणी पुरुष कर्मचारी / स्वयंसेवकांमार्फत करण्यात येईल. या शोध मोहिमेसाठी एक आशा कार्यकर्ती किंवा स्त्री स्वयंसेविका व एक पुरुष स्वयंसेवक यांची एक याप्रमाणे ६९ टीम स्थापन करण्यात आल्या असून १३८ टीम सदस्यांद्वारे त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रातील लोकांची गृहभेटीद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. याद्वारे समाजातील निदर्शनास न आलेले प्राथमिक अवस्थेतील कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण या आजाराचे रुग्ण शोधून औषधोपचार मिळवून देण्यास मदत मिळणार आहे.
समाजात क्षयरोगा विषयी जनजागृती करुन क्षयरोगाचे निदाना अभावी अद्यापही वंचित असणाऱ्या क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांना क्षयरोग औषधोपचारावर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, मोहीमेद्वारा सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिमेचा उपयोग होईल व चंद्रपूर शहर क्षयमुक्त होण्यासाठी मदत होईल त्यामुळे घरी येणाऱ्या पथकाला तपासणीसाठी सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त राजेश मोहीते यांनी केले आहे.
६९ टीमचे १३८ सदस्य १४ दिवसांत सर्वेक्षण करणार
या अभियानाकरिता २३,९९८ घरांमधील निवडलेल्या १,०३,८२९ लोकसंख्येचे सर्वेक्षण होणारआहे.
एकूण घरे – २३,९९८
एकूण टीम – ६९
एकूण टीम सदस्य – १३८
एकूण पर्यवेक्षक – १८
या अभियानासाठी मनपा क्षेत्रातील निवडलेली लोकसंख्या १,०३,८२९
कुष्ठरोग लक्षणे कशी असतात? (symptoms of leprosy)
त्वचेवर फिकट/लालसर बधीर चट्टा, त्याठिकाणी घाम न येणे
जाड, बधीर तेलकट/चकाकणारी त्वचा
त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळ्या जाड होणे
भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद करता न येणे
तळहातावर व तळपायावर मुंग्या येणे, बधीरपणा अथवा जखमा असणे
हाताची व पायाची बोटे वाकडी असणे, हात मनगटापासून किंवा पाय घोट्यापासून लुळा पडणे
त्वचेवर थंड व गरम संवेदना न जाणवणे
हात व पायामध्ये अशक्तपणा जाणवणे, हातातुन वस्तु गळून पडणे, चालताना पायातुन चप्पल गळून पडणे
क्षयरोग लक्षणे काय असतात? (What are the symptoms of tuberculosis)
दोन आठवडयापेक्षा जास्त कालावधीचा खोकला
दोन आठवडयापेक्षा जास्त कालावधीचा ताप
वजनात लक्षणीय घट
थुंकीवाटे रक्त येणे