नागपूर, ता. २३ : मोहगाव झिल्पी येथे स्थापित श्री सिद्धिविनायक मंदिराला राज्याचे माजी मुख्यमंत्री विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच भेट दिली व श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.
यावेळी त्यांच्यासमवेत श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष नागपूर शहराचे माजी महापौर संदीप जोशी, संस्थेचे विश्वस्त पराग सराफ, रितेश गावंडे उपस्थित होते.
श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मंदिर परिसराची पाहणी केली व कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, मोहगाव झिल्पीच्या तलावानजीक श्री सिद्धिविनायकाचे एक अत्यंत सुंदर मंदिर स्वरूप घेतलेले आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे एक सुंदर पर्यटन क्षेत्र साकारले गेले असल्याचा आनंद आहे. या ठिकाणी प्रति सिद्धिविनायकाचेच दर्शन होते. त्यामुळे आता मुंबईला जाण्याची गरज नाही नागपूरातच विदर्भातील सर्वांना श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेता येईल, अशी अपेक्षाही देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
आपल्या हातून आयुष्यात एकतरी मंदिर बांधले जाणे ही फार मोठी गोष्ट आहे. ती आपल्या हातून झाली यासाठी आपले मन:पूर्वक अभिनंदन अशा शब्दांत श्री. देवेंद्र फडणवीस यांनी श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष माजी महापौर संदीप जोशी यांच्या कार्याचा गौरव केला.
मंदिराच्या पुढील कार्यासाठी तसेच श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टच्या माध्यमतून सुरू असलेल्या उपक्रमांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाहीही यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
याप्रसंगी मंदिराचे बांधकाम कार्य करणारे दिलीप बागडे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.