नागपूर :- जिल्हा परिषदेच्या चार सभापती आज झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादीने एकतर्फी विजय मिळविला. यात कॉंग्रेसचे राजकुमार कुसुंबे, मिलिंद सुटे, अवंतिका लेकुरवाळे व राष्ट्रवादीचे बाळू उर्फ प्रवीण जोध विजय झाले.
दरम्यान सकाळीच कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री सुनील केदार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी सर्व सदस्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर सभापती पदासाठीच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. सभापती पदासाठी अनेक जण इच्छुक होते. कॉंग्रेसने नावे जाहीर करताच काहींना धक्का लागला. यावर काहींनी नाराजीही व्यक्त केली. रामटेक विधानसभा मतदार संघातून दुधाराम सव्वालाखे व शांता कुमरे यांच्या नावाची चर्चा होती. परंतु सर्वांना धक्का देते राजकुमार कुसुंबे यांचे नाव जाहीर करण्यात आले. ते सुनील केदार यांचे विश्वासू असल्याचे सांगण्यात येते. मिलिंद सुटे यांच्या नावाला उमरेडमधील काही नेत्यांनी विरोध केल्याची माहिती आहे. परंतु केदार व माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्या बाजू घेतल्याने त्यांचे नाव अंतिम झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. या निवडणुकीत सर्व उमेदवारांना ३८ मते मिळाली. तर भाजपच्या उमेदवारांना १३ मतावर समाधान मानावे लागले.
कंभाले, कवरे, झाडेसह सहा जण अनुपस्थित, मानकर तटस्थ
अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बंडाचा झेंडा फडकवणारे नाना कंभाले व प्रितम कवरे हे अनुपस्थित होते. त्याच प्रमाणे शिवसेना (शिंदे समर्थक) सदस्य संजय झाडे यांनी सुद्धा येणे टाळले. अप्रत्यश्ररित्या त्यांना भाजपचे संख्याबळ कमी केले. त्याच प्रमाणे विरोध पक्ष नेते आतिश उमरे, राष्ट्रवादीचे सदस्य सलील देशमुख व कॉंग्रेस सदस्य शंकर डडमलही अनुपस्थित होते. मागील निवडणुकीत बंडखोरांना मतदान करणाऱ्या मेघा मानकर यांनी यावेळी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.
भाजपने ऐनवेळी घेतला निवडणुकीचा निर्णय
आज सकाळीच भाजपची बैठक झाली. यात निवडणूक लढावे की नाही, याबाबत चर्चा झाली. कॉग्रेस सदस्यांचा साथ मिळणार नसल्याने ही निवडणूक न लढण्याबाबत काहींचा सूर होता. परंतु निवडणूक न लढल्यास वेळगा संदेश जाईल, असाही सूर निघाल्याने ऐनवेळी भाजपने निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला.
उमेदवार त्यांना मिळालेली मते
शिक्षण व अर्थ सभापती (संभाव्य)
राजकुमार कुसुंबे (कॉंग्रेस) – ३८
प्रमिला दंडारे (कॉंग्रेस) – १३
कृषी समिती (संभाव्य)
बाळू जोध (राष्ट्रवादी) – ३८
सतीश दंडारे (भाजप) – १३
समाज कल्याण समिती
मिलिंद सुटे (कॉंग्रेस) – ३८
सुभाष गुजरकर – १३
महिला व बाल कल्याण समिती
अवंतिका लेकुरवाळे (कॉंग्रेस) – ३८
पुष्पा चाफले (भाजप) – १३
बंग गटाला धक्का
दिनेश बंग यांना सभापती मिळण्यासाठी बंग गटाचा आग्रह होता. परंतु स्थायी समितीसह गट नेते पदही त्यांच्याकडे असल्याचा मुद्दा उपस्थित करीत विरोध झाला. काटोल मतदार संघाला गेल्यावेळी पद न मिळाल्याने या मतदार संघात ते देण्याची मागणी देशमुख गटाची होती. त्यामुळे शेवटी देशमुख गटाच्या बाळू जोध यांनी उमेदवारी देण्यात आली.