चंद्रपूर :- १९ सप्टेंबर पासुन सुरु झालेला गणेशोत्सव अनंत चतुर्दशी म्हणजे २८ सप्टेंबर रोजी निरोप घेत आहे, मात्र याच दिवशी ईद-ए-मिलाद उत्सव सुद्धा असल्याने कुठल्याही स्वरूपाचे वादविवाद टाळण्यास सदर दिवशी कुणीही कुठल्याही स्वरूपाचे बॅनर, स्वागत गेट,कमानी,पताका उभारू वा लावु नये असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, स्थापनेपासुन सुरु झालेला उत्साह विसर्जन दिवशी चरणसीमेवर असतो. साधारण लाखावर लोक विसर्जन यात्रेत सहभागी असल्याने शहरातील रस्त्यांवर उभे राहण्यास सुद्धा जागा मिळत नाही. विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठे गणेश मंडळ,राजकीय, सामाजीक पक्ष,सेवाभावी संघटना यांच्याद्वारे शहरातील मुख्य चौरस्ते,दर्शनी मार्ग,महात्मा गांधी रोड पठाणपुरा गेट ते जटपुरा गेट,डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते बिनबा गेट,अंकलेश्वर गेट ते गांधी चौक व कस्तुरबा रोड या मुख्य मिरवणुकीच्या मार्गांवर व परिसरात पताका,तोरण,विद्युत रोषणाई,स्वागत गेट, कमानी, होर्डींग,बॅनर,पोस्टर्स उभारण्यात येतात.
यंदा मुस्लीम समुदायाचा ईद-ए-मिलाद उत्सव सुद्धा असल्याने दोन्ही उत्सव एकाच दिवशी येत आहेत.दोन्ही उत्सवात मिरवणुक काढण्याची प्रथा असल्याने दोन्ही समुदायांतर्फे पताका,तोरण,विद्युत रोषणाई,स्वागत गेट, कमानी, होर्डींग,बॅनर,पोस्टर्स उभारण्यात येत असतात. दोन्ही उत्सव एकाच दिवशी असल्याने या पताका, तोरण,कमानी, होर्डींग,बॅनर,पोस्टर्स इत्यादी नकळत तुटणे, काही अंशी क्षती होणे,नुकसान होणे या सारखे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अश्या प्रकारांमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची संभावना निर्माण होऊ शकत असल्याने २८ सप्टेंबर रोजी सर्व प्रकारच्या पताका,तोरण,विद्युत रोषणाई,स्वागत गेट, कमानी, होर्डींग, बॅनर,पोस्टर्सवर निर्बंध घालण्यात येत असुन सदर निर्बंध हे सामाजीक सलोख्याच्या दृष्टीने महत्वाचे असल्याने नागरीकांनी यात सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.