– कोल्हापूरच्या विकासात आणि पर्यटनाला गती देणाऱ्या विमानतळासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शुभेच्छा
कोल्हापूर :- देशात सात राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमधे 9 हजार 800 कोटींहून अधिक खर्चाचे 15 विमानतळ प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनलचा समावेश होता. या नवीन टर्मिनलचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीव्दारे झाले. या कार्यक्रमांतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर विमानतळाच्या या नवीन इमारतीची पाहणी करून हे विमानतळ कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडेल असे मत व्यक्त केले.
कोल्हापूर येथून या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाधिकारी अमोल येडगे, विमानतळ प्राधिकरणाचे पियुष श्रीवास्तव, दिलीप सजनानी, संजय शिंदे यांचेसह इतर मान्यवर उपस्थित होते.
कोल्हापूरसह अलीगड, आझमगड, चित्रकूट, मुरादाबाद, श्रावस्ती, ग्वाल्हेर, पुणे, आदमपूर, जबलपूर, दिल्ली आणि लखनौ येथे नवीन तसेच सुधारित विमानतळ टर्मिनल इमारतींचे उद्घाटन आणि कडप्पा, हुब्बल्ली, बेळगावी येथे नवीन टर्मिनल इमारतींची पायाभरणी प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते झाली. कोल्हापूर येथे या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या विकासात आणि पर्यटनाला गती देणाऱ्या विमानतळासाठी शुभेच्छा दिल्या.
कोल्हापूर विमानतळाची स्थापना राजाराम महाराजांनी 1939 मध्ये केली होती. आज लोकर्पण केलेल्या नूतन इमारतीतून कोल्हापूर जिल्हयाची संस्कृती आणि वारसा दृश्य स्वरूपात प्रवाशांना पाहता येणार आहे. अतिशय सुंदर आणि दिमाखात बांधकाम केलेल्या इमारतीचा कोल्हापूर जिल्हयाला पर्यटन आणि विकासासाठी हातभार लागणार असल्याचे सर्वच मान्यवरांनी या कार्यक्रमावेळी सांगितले. पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी नूतन टर्मिनलची सर्वत्र फिरून बारकाईने पाहणी केली.
कोल्हापूर विमानतळाची संक्षिप्त माहिती
दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर हे शतकानुशतके समृद्ध ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे केंद्र राहिले आहे, ज्यामुळे ते विविधता आणि एकतेचे खरे प्रतिनिधित्व करते. याला “दक्षिण काशी किंवा “महातीर्थ असे संबोधले जाते. कोल्हापूर हे पूर्वीच्या राजघराण्यांचे किल्ले, मंदिरे आणि राजवाडे यासाठी देखील ओळखले जाते आणि महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात प्रगत जिल्ह्यांपैकी एक आहे. तसेच कृषी आधारित उद्योगात अग्रगण्य जिल्हा म्हणूनही कोल्हापूर ओळखला जातो.
कोल्हापूर विमानतळावर रात्रीची हवाई सेवा सुरु केल्याने कोल्हापूर विमानतळावरील प्रवासी वाहतूक वाढली आहे. विद्यमान टर्मिनल इमारतीची प्रवासी हाताळणी क्षमता 150 प्रवाशांपर्यंत होती, जी मागणीच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यानुसार, भविष्यातील वाहतूक वाढ लक्षात घेऊन एटीसी टॉवर कम टेक्निकल ब्लॉक आणि एअरसाइड वाढीसह नवीन टर्मिनल बिल्डिंगचे नियोजन करण्यात आले. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने 255 कोटी खर्चुन A-320 प्रकारच्या विमानांच्या संचालनासाठी विमानतळ विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन टप्यात धावपट्टी आणि संबंधित कामांच्या विस्तारासाठी राज्य सरकारकडून 65 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. सध्या उपलब्ध असलेल्या जागेत पहिल्या टप्प्यातील विकासकामे पूर्ण झाली आहेत.
कोल्हापूर विमानतळाचे टर्मिनल भवन स्थानिक संस्कृती आणि वारसा लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे, जेणेकरून त्याचे सार आतील आणि बाहेरील दोन्हींमध्ये प्रतिबिंबित होईल, नवीन टर्मिनल इमारतीच्या दर्शनी भागावरील मोठे तोरण हे सामान्यतः कोल्हापूर शहरातील महाराजांच्या राजवाड्यात वापरल्या जाणाऱ्या वास्तू किंवा नवीन राजवाडा, भवानी मंडप इत्यादी वारसा वास्तूंद्वारे प्रभावित आणि प्रेरित आहेत.
त्याप्रमाणेच टर्मिनल भवनाच्या आत बसवलेल्या कलाकृती कोल्हापूर शहरातील समृद्ध कला, स्थापत्य आणि संस्कृतीचे वैभव दर्शवतात. पर्यटकांना या ठिकाणाची जाणीव करून देण्यासाठी, त्यांना स्थानिक संस्कृती, वारसा, उपजत परंपरा, धार्मिक श्रद्धा, सामाजिक जीवन आणि विविध पर्यटनस्थळांची चित्रे, चर्मकला (लेदर वर्क) आणि कोल्हापुरी साजच्या कलाकृती प्रदर्शित केल्या आहेत. येथील धावपट्टीचा विस्तार 1370 मीटर ते 1780 मीटरचा आहे, 03 पार्किंग वे (1 A-320+2 ATR-72 प्रकारच्या विमानांसाठी आहे.
नवीन टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ 3900 चौ.मी असून तासी प्रवाशी क्षमता 500 आहे. वार्षिक क्षमता 5 लाख प्रवाशी आहे. वाढीव हवाई कनेक्टिव्हिटी पर्यटन, व्यवसाय, शिक्षण आणि रोजगार निर्मितीला चालना देवून कोल्हापूरच्या आर्थिक समृद्धीसाठी आवश्यक आहे. कोल्हापूर विमानतळाच्या विकासामुळे या भागातील हस्तकला उद्योगाच्या वाढीस मदत होईल ज्यात कापड, चांदी, मणी आणि पेस्ट दागिन्यांची हस्तकला, मातीची भांडी, लाकूड कोरीव काम आणि लाखेची भांडी, पितळी पत्रे आणि ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर आर्टवर्क आणि लेस आणि भरतकाम यांचा समावेश आहे.