Ø जिल्हाधिकाऱ्यांकडून खरीप हंगाम तयारीचा आढावा
Ø जिल्ह्यात 8 लाख 97 हजार हेक्टरवर खरीप नियोजन
Ø गेल्या हंगामात कमी कर्जवाटप करणाऱ्या बॅकांना नोटीस
यवतमाळ :- खरीप हंगाम काही दिवसांवर आला आहे. या हंगामात शेतकऱ्यांना पिककर्ज उपलब्धतेसह आवश्यक निविष्ठा जसे बियाणे, खते, किटकनाशके पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील, याची दक्षता घ्या. हंमागाचे अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी केल्या.
महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांनी खरीप हंगाम नियोजन तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे यांच्यासह सर्व उपविभागीय कृषि अधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात खरीप हंगामात 8 लाख 97 हजार 390 हेक्टरवर पेरणीचे नियोजन आहे. त्यात कापूस सर्वाधिक 4 लाख 57 हजार 510 हेक्टरवर पेरणी होणार आहे. त्यापाठोपाठ सोयाबीन 2 लाख 94 हजार 260 तर तूर 1 लाख 15 हजार 400 हेक्टर लागवडीचे नियोजन आहे. खरीप ज्वारी 4 हजार 50 हेक्टर, बाजरी 250 हेक्टर, मका 410 हेक्टर, मुग 2 हजार 375 हेक्टर, उडीद 2 हजार 240 हेक्टर, तीळ 81 हेक्टर, उस 7 हजार 252 हेक्टर तर भाजीपाला व फळे 13 हजार 562 हेक्टर लागवडीचे नियोजन आहे. यंदा सोयाबिनचे क्षेत्र 2 लाख 94 हजार 260 हेक्टर ईतके राहणार आहे.
प्रस्तावित लागवडीप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी बियाणे उपलब्धतेचा आढावा घेतला. प्रस्तावित कापूस क्षेत्रफळासाठी जिल्ह्याला 2 लाख 38 हजार 400 पाकीट बियाण्यांची आवश्यक्ता भासणार आहे. त्यापाठोपाठ सोयाबिणचे 2 लाख 20 हजार 695 क्विंटल बियाण्याची गरज राहणार आहे. प्रस्तावित पिकपेऱ्याप्रमाणे प्रत्येक पिकासाठी लागणाऱ्या बियाण्यांची उपलब्धता विविध कंपन्यांकडून होणार आहे.
खरीप हंगामासाठी जिल्ह्याला 2 लाख 54 हजार 450 मेट्रीक टन इतक्या विविध प्रकारच्या खतांची आवश्यकता आहे. त्यापैकी 2 लाख 28 हजार मेट्रीक टन खते मंजूर झाले असून गेल्यावर्षीची खते शिल्लक असल्याने यावर्षी खतांची कोणत्याही प्रकारची टंचाई भासणार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. जिल्ह्याला चार रॅक पॅाईंवरून खते उपलब्ध होणार आहे. उमरखेड, महागाव, पुसद, दिग्रस या तालुक्याला नांदेड जिल्ह्यातील माळटेकडी येथून, वणी, मारेगाव, झरी जामणी तालुक्याला चंद्रपुर येथून, घाटंजी, कळंब, यवतमाळ, बाभुळगाव, आर्णी, नेर, पांढरकवडा, पुसद, दिग्रस, आर्णी, दारव्हा या तालुक्यांना अमरावती जिल्ह्याताली धामणगाव येथून तर पुसद, आर्णी, दारव्हा या तालुक्यांना वाशिम येथील रॅक पॅाईंटमधून देखील खते उपलब्ध होणार आहे.
गेल्या हंगामात पिकविमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या नोंदणीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबविला. यावर्षी देखील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे. शेतकऱ्यांना बॅंकांकडून पिककर्ज वेळेत उपलब्ध होणे आवश्यक आहे. कुठेही पात्र शेतकरी कर्जापासून वंचित राहू नये, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. गेल्या हंगामात ज्या बॅंकांनी कमी प्रमाणात पिककर्जाचे वाटप केले आहे, अशा बॅंकांना नोटीस देण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा अग्रणी बॅंकेस केल्या.
रेशीम पिकाचे क्षेत्र वाढविण्यात यावे. आर्गेनिक कॅाटनसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करा. औषधी वनस्पती अधिक उत्पादन देणारी पिके आहे, अशा पिकांचे क्षेत्र वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. खरीप हंगामात कृषि निविष्ठा उपलब्धतेसाठी शेतकऱ्यांना कुठेही अडचण जावू नये. निविष्ठा उत्तम दर्जाच्या असाव्या. गुणनियंत्रणासाठी भरारी पथके नेमून सातत्याने गुणवत्तेकडे लक्ष दिले जावे, असे देखील जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.