सेनासाहेबसुभा श्रीमंत राजे रघुजी भोसले प्रथम यांची २६७ वी पुण्यतिथी
जयसिंगराजे भोसले यांच्याद्वारे दीपोत्सव, सारस्वतांची उपस्थिती
युवा इतिहासकार अथर्व शिवणकर यांच्याद्वारे वारसास्थळ सहलीचे आयोजन
नागपूर : नागपूरच्या महाल परिसरात स्थित ‘काशीबाई राजघाट’ हे भोसल्यांच्या इतिहासाचा वारसा सांगणारे चैतन्यस्थळ. हा परिसर आज २६७ दिव्यांच्या ज्योतींनी न्हाऊन निघाला. प्रसंग होता सेनासाहेबसुभा श्रीमंत राजे रघुजी भोसले प्रथम यांच्या २६७ व्या पुण्यतिथीचा. राजे रघुजी हे नागपूरचे पहिले मराठा शासक. काशीबाई राजघाट येथे रघुजीराजेंची समाधी आहे. त्यांच्या सती झालेल्या सहा राण्यांच्या पुण्यस्मृतीपर असलेल्या सहा छत्र्या हे या समाधीस्थळाचे वैशिष्ट्य. नागपूरच्या भोसले घराण्याच्या इतिहासातील सर्वाधिक महत्वाच्या स्थळांपैकी हे स्थळ होय.
तरुण पिढी इतिहासासंदर्भात उदासीन आहे हा समाज साफ चुकीचा ठराव असा सुखद प्रतिसाद तरूणांकडुन या कार्यक्रमास लाभला. सायंकाळी नागपूरचे युवा इतिहासकार अथर्व शिवणकर यांनी हेरिटेज वॉक चे आयोजन केले होते. नागपूर विद्यापीठ व विविध महाविद्यालयांचे विदयार्थी उत्साहाने हेरिटेज वॉकसाठी उपस्थित होते. इतिहास संशोधिका सौ. प्राची गांगुलवार, पुरातत्व विभाग, प्रादेशिक कार्यालय नागपूरच्या सहाय्यक संचालक व नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयाच्या अभिसंरक्षिका सौ. जया वहाणे यांच्या उपस्थितीत ज्ञानसंवर्धक हेरिटेज वॉक झाली. भोसल्यांचा व प्राचीन नागपूरचा इतिहास शिवणकर यांनी अतिशय रंजकरित्या जिवंत केला. यानंतर जयसिंगराजे भोसले यांच्याहस्ते दीपोत्सवास सुरुवात झाली. उपस्थित तरुणांनी २६७ दिव्यांची आरास करून गतवैभवाचे चैतन्य अनुभवले.
याप्रसंगी काशीबाई राजघाटाच्या जीर्णोद्धार व सौंदर्यीकरणाबाबत चर्चा झाली. या वारसास्थाच्या मुळ स्वरुपानुरूप जीर्णोद्धारासाठी सुरु असलेले प्रयत्न जयसिंगराजेंनी सांगितले. जीर्णोद्धाराबरोबरच भोसल्यांच्या शैलीत सुंदर बगिचासुद्धा नियोजित आहे. वारसा समितीने सी. एस. आर. निधीसाठी प्रयत्न करावेत असे जया वहाणे यांनी सुचविले. जीर्णोद्धारासाठी आवश्यक ती तांत्रिक माहिती व कौशल्य पुरविण्याची तयारी त्यांनी दर्शविली. नागपूर शहरात आजघडीला तिनशे अधिसूचित वारसास्थळे आहेत. वारसास्थळांचे संवर्धन व पर्यटन वाढीस लागावे यादृष्टीने शासन व नागरिक दोहोंकडून प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे ऑरेंज ओडीसीच्या संचालिका मंदिरा नेवारे म्हणाल्या. श्रुती घाटे यांनी वारसास्थळाची छायाचित्रे घेतली. छायाचित्रांद्वारे सोशल मीडियाच्या माध्यमातून वारसास्थळांबाबत जागरूकता निर्माण कशी करावी याबद्दल त्यांनी माहिती दिली. तोशिता मुरुगकर, इशिका इलमे, अनुष्का इंगळे इत्यादी विद्यार्थिनींनी नागपूरच्या इतिहासाबाबत त्यांच्या मनात असलेले प्रश्न विचारले. या अभिनव उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल जयसिंगराजे भोसले यांनी अथर्व शिवणकर यांचे कौतुक केले. शहराच्या इतर वारसास्थळांना भेट देऊन इतिहासाची अधिक माहिती जाणून घेण्याची उत्सुकता उपस्थित तरुणांनी दर्शविली.