संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी नगर परिषदच्या नगरसेवकांचा पंचवार्षिक कार्यकाळ संपून एक वर्ष लोटला असून 12 फेब्रुवारी 2022 पासून नगर परिषद मध्ये प्रशासक राज सुरू झाले.या प्रशासक राजवटीला ही वर्षपूर्ती झाली तरीही कामठी नगर परिषद निवडणुकीचा श्रीगणेशा झालेला नाही. वास्तविकता नगर पालिका निवडणुकीचे प्रकरण बऱ्याच दिवसापासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र निवडणुका होत नसल्याने कार्यकर्ते अस्वस्थ होऊन बसले आहेत तर कार्यकर्त्यांना खुश ठेवणारे व प्रभागात आपल्या प्रभावाची छाप सोडणारे माजी नगरसेवक,इच्छुक उमेदवारांचे लाखो रुपये खर्च होत आहेत.
इच्छुक माजी नगरसेवकांनी पूनश्च निवडून येण्यासाठी कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणीला वेग दिला आहे.तसेच कार्यकर्ते व मतदारांना खुश ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. निवडणूक लवकर व्हावी यासाठी माजी नगरसेवकासह इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहेत.पण निवडणूक काही जाहीर होत नाही.कधी एकदाची निवडणूक होईल अशी सर्वांची भावना झाली आहे. पण इच्छुकांची खरी पंचायत नागरिकांना दिलेल्या आश्वासनाना पूर्ण करताना होत आहे.मागील वर्षीपासून दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने इच्छुक उमेदवारांची एक प्रकारे गोच्छीच होत आहे. तर माजी नगरसेवक स्वतःच्या तर्किय अनुभवाच्या आधारावर ही निवडणूक दिवाळी नंतर होईल असे सांगत आहेत तेव्हा निवडणूक केव्हा होईल याचे उत्तर अजूनही अनुत्तरीय आहे.