– राजस्थानने बरोबरीत रोखल्यामुळे महिला संघापुढे साखळीतच गारद होण्याची भीती
पणजी :-महाराष्ट्राच्या पुरुष कबड्डी संघाने रविवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत साखळीतील सलग दुसऱ्या विजयानिशी बाद फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. राजस्थानने बरोबरीत रोखल्यामुळे महिला संघ मात्र साखळीतच गारद होण्याची शक्यता आहे.
पुरुष गटातील अ-गटाच्या सामन्यात महाराष्ट्राने तमिळनाडूला ४४-२१ असे पराभूत केले. नैसर्गिक खेळ करीत पहिल्या सत्रात २४-११ अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या सत्रात तमिळनाडूने आक्रमकतेने भर देत महाराष्ट्राचे चार गडी एक एक करून टिपले. शेवटचे ३गडी शिल्लक असताना तामिळनाडूला महाराष्ट्रावर लोण देण्याची संधी होती. पण किरण मगरने अव्वल पकड करीत त्यांचा बेत हाणून पाडला. त्यानंतर महाराष्ट्राने तो लोण तामिळनाडूवर देत महाराष्ट्राची आघाडी वाढवली.
शेवटची ५ मिनिटे पुकारली, तेव्हा ४१-१७ अशी आघाडी घेत महाराष्ट्राने आधीच सामना खिशात टाकला होता. आकाश शिंदे, तेजस पाटील, आदित्य शिंदे यांच्या झंझावाती चढाया त्यांना अरकम शेख, किरण मगर यांची मिळालेली बचावाची भक्कम साथ यामुळे महाराष्ट्राने मोठ्या फरकाने विजय मिळविता आला. दुसऱ्या सत्रात अक्षय भोइरला खेळण्याची संधी देण्यात आली. त्याने देखील अष्टपैलू खेळ करीत मिळालेल्या संधीचे सोने केले. महाराष्ट्राचा शेवटचा साखळी सामना चंदीगडशी होईल.
महाराष्ट्राच्या महिला संघाला ब-गट साखळी सामन्यात राजस्थानविरुद्ध ३०-३० अशा बरोबरीने साखळीतच गारद होण्याची भीती निर्माण झाली. सुरुवात झकास करीत महाराष्ट्राच्या महिलांनी पूर्वार्धात १८-१२ अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात शेवटच्या काही मिनिटात लोण देत महाराष्ट्राने २७-१६ अशी आघाडी वाढवली. पण शेवटच्या ३ मिनिटात राजस्थानने जोरदार प्रतिहल्ला करीत बरोबरी साधण्यात यश मिळवले. शेवटच्या क्षणी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी राजस्थानला नाहक गुण बहाल केले. महाराष्ट्राकडून रेखा सावंत पकडीत, तर हराजित कौर चढाईत बरी खेळली.