– अकोला ते नागपूर प्रवासादरम्यान घटना
-पावनेदोन लाखांच्या मंगळसुत्रासह सोनसाखळी आणि रोख चोरी
नागपूर :-अकोला ते नागपूर प्रवासादरम्यान अज्ञात चोराने हॅण्ड बॅगमधून पावनेदोन लाखांच्या मंगळसुत्रासह सोनसाखळी आणि रोख चोरून नेली. ही घटना अजमेर-पुरी एक्सप्रेसमध्ये घडली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. हिना पिंपळकर, रा. अयोध्यानगर असे फिर्यादी महिलेचे नाव आहे.
हिना त्यांच्या दोन मुलांसह कौटुंबिक समारंभासाठी अकोला येथे गेल्या होत्या. समारंभ आटोपल्यानंतर बुधवारी त्या दोन मुले आणि आई सोबत अजमेर पुरी एक्सप्रसने नागपुरला निघाल्या. एस-1 डब्यात 67 आणि 69 अशा दोन बर्थ वरून त्या प्रवास करीत होत्या.
त्यांच्याकडे एक हॅण्डबॅग होती. पॉलिथिनमध्ये एक लाख 75 हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्र, 13 हजार 500 रुपये किंमतीची सोनसाखळी, रोख 30 हजार असा एकूण 2 लाख 18 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल होता. हे संपूर्ण दागिने त्यांनी हॅण्डबॅगमध्ये ठेवले. बुधवार 17 मे च्या रात्री त्या नागपुरात उतरल्या, ऑटोरीक्षाने घरी गेल्या. ऑटोत त्यांच्या शिवाय दुसरे कोणीही नव्हते. दुसर्या दिवशी म्हणजे गुरूवारी सकाळी हिनाची आई दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी हॅण्ड बॅगमध्ये पॉलिथिन शोधत होती. मात्र, दागिण्यांची पॉलिथिन मिळून आली नाही. त्यांनी सर्वत्र शोध घेतला. विचारपूस केली. मात्र, दागिने मिळाले नाही. हिणा यांनी लोहमार्ग पोलिस ठाणे गाठून सारा प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.