“कलम 370 रद्द केल्यानंतरचे जम्मू आणि काश्मीर, भारताच्या भविष्यातील विकासकथेचा पथदर्शक म्हणून उदयास येईल” – केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह

नवी दिल्ली :-“कलम 370 रद्द केल्यानंतरचे जम्मू आणि काश्मीर, भारताच्या भविष्यातील विकासकथेचा पथदर्शक म्हणून उदयास येईल”, असे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. कलम 370 रद्द करण्याच्या 5 व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला आज दूरदर्शनला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. जितेंद्र सिंह हे, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार), तसेच पंतप्रधान कार्यालय, अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री आहेत.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमधील आजवर काहीशी छुपी राहिलेली नैसर्गिक साधनसंपत्ती आणि सुप्त मनुष्यबळ उजेडात आले आहे आणि याचे ताजे उदाहरण म्हणजे भदेरवाह येथे घडलेल्या “पर्पल रिव्होल्युशन” चे म्हणजे जांभळ्या क्रांतीचे(लव्हेंडर या निळ्या जांभळ्या सुगंधी आणि औषधी वनस्पतीची शेती) आहे. त्यांनी पुढे सांगितले की या क्रांतीमुळे भारताला कृषी-नव उद्योगाचा एक नवीन प्रकार दिला आहे. या क्रांतीमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण मूल्यवर्धनाचे योगदान मिळण्याची एक प्रकारे हमी मिळत आहे कारण आपल्या अर्थव्यवस्थेची वाटचाल काही वर्षांत 3 ऱ्या आणि नंतर अव्वल स्थानी पोहोचण्याच्या दिशेने सुरु आहे, असेही ते म्हणाले.

“कलम 370 रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळे गेल्या सात दशकांपासून वंचित असलेल्या जम्मू आणि काश्मीरमधील मोठ्या लोकसंख्येला नागरिकत्वाचे अधिकार मिळाले”, असेही जितेंद्र सिंह यांनी सांगितले. ते म्हणाले, “आपण 5 वा वर्धापन दिन साजरा करत असताना काही महत्त्वपूर्ण घडामोडी अत्यंत उल्लेखनीय आहेत. गेल्या 5 वर्षांत लोकशाही, राज्य कारभार, विकास आणि सुरक्षा स्थिती या चार पातळ्यांवर व्यापक परिवर्तन झाले आहे.

काश्मिरमधील लोकशाहीबाबत बोलताना डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, जम्मू-काश्मीरमध्ये स्थायिक झालेल्या पाकिस्तानी निर्वासितांना सात दशके मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात आले होते आणि तरीही इंद्रकुमार गुजराल आणि डॉ. मनमोहन सिंग हे त्यापैकी दोघेजण भारताचे पंतप्रधान बनले.

कट्टरतावादी आणि त्यांचे सहानुभूतीदार यांच्या बद्दल बोलताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशांविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे आणि नवी दिल्लीतील पाक दूतावासाने ज्यांचे पाहुणे म्हणून आतिथ्य केले होते त्यांचा आता दिल्लीच्या तिहार तुरुंगात पोलिसी पाहुणचार होत आहे. यावरून हेच दिसून येते की हे सरकार भारतविरोधी कारवाया अजिबात सहन करत नाही. जम्मू काश्मिर मध्ये राष्ट्रध्वज फडकवणे हे एकेकाळी अनेकांचे स्वप्न होते आणि आता जम्मू-काश्मीरमधील प्रत्येक सरकारी कार्यालयावर तिरंगा फडकवला जातो, असेही त्यांनी निक्षून सांगितले.

जम्मू काश्मीरमधील राज्यकारभाराविषयी बोलताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी आठवण करून दिली की पंचायत राज कायद्यातील 73 वी आणि 74 वी सुधारणा केंद्रातील काँग्रेस सरकारने केली खरी, परंतु जम्मू-काश्मीरमधील कॉंग्रेस प्रणित आघाडी सरकारने ती राज्यात मात्र लागू केली नाही. जम्मू काश्मिर मध्ये 2019 पूर्वी केंद्रीय निधी उपलब्ध नसल्यामुळे येथे लोकशाहीचे विकेंद्रीकरण होऊ शकले नाही, असेही ते म्हणाले.

या प्रदेशातील सुरक्षा आणि शांतते संदर्भात बोलताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी टिप्पणी केली की, आपण आता दहशतवाद निर्मूलनाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. गेल्या दशकात आणि विशेषत: कलम 370 रद्द झाल्यानंतरच्या गेल्या 5 वर्षांत, केंद्राला दहशतवाद रोखण्यात यश आले आहे असे सांगत त्यांनी, विशिष्ट पद्धतीने पसरवला जाणारा दहशतवाद कमी झाल्याचे स्पष्ट केले. अलीकडील घटनांबद्दल बोलताना ते म्हणाले की दहशतवाद्यांची पळापळ सुरु असून केवळ अस्तित्व दाखवून देण्यासाठी ते दुर्बळांवर हल्ले करत आहेत, मात्र लवकरच अशा प्रकारांवर देखील नियंत्रण मिळवण्यात येईल.

या प्रदेशातील शांतता आणि स्थैर्य अधोरेखित करताना डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत सुमारे 2.5 कोटी देशी आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली आहे. आपल्या कुटुंबियांसह आणि प्रियजनांसह इथे येणारे लोक म्हणजे शांततेच्या पुनर्स्थापनेचा पुरावाच आहेत. श्रीनगर येथे झालेली G20 ची यशस्वी बैठकही याचीच साक्ष आहे, असे ते म्हणाले.

डॉ जितेंद्र सिंह यांनी अधोरेखित केले की जम्मू आणि काश्मीरमधील युवावर्ग अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे आणि या भागातील विद्यार्थ्यांची नागरी सेवा, क्रीडा आणि इतर उच्च शिक्षण, पर्यटन आणि आदरातिथ्य यांसारखी क्षेत्रे या मधील अलीकडची कामगिरी या गोष्टीची साक्ष आहे की जी महत्वाकांक्षा आजवर सुप्त राहिली, अनेक वर्षांपासून जी आशा लुप्त झाली होती, ती आता पुन्हा पल्लवीत झाली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पुण्यात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय लष्कराची तुकडी तैनात

Mon Aug 5 , 2024
पुणे :-पुण्यातील संततधार पाऊस आणि खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे, भारतीय सैन्यदलाने एकता नगरमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी एक पूरग्रस्त मदत तुकडी त्वरीत तैनात केली आहे. जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने आज सकाळी 9:15 वाजता भारतीय लष्कराच्या सहाय्याची मागणी केल्यानंतर त्वरीत ही कार्यवाही करण्यात आली. पूरग्रस्त भागात तैनात केलेल्या या तुकडीत सुमारे 100 जवानांचा समावेश आहे. या तुकडीमध्ये मराठा लाईट इन्फंट्रीच्या पायदळातील जवान, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com