इस्त्रोची माहिती देणारी गाडी ‘स्पेस ऑन व्हिल्स’, इंडियन सायन्स काँग्रेसमधील विशेष आकर्षण

नागपूर :– अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेप्रमाणे भारताची कार्यरत असलेली अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रो. देशातील अनेक अंतराळ मोहीमा यशस्वीरीत्या राबवून या संस्थेने देशाचे नाव जगभर पोहोचविले आहे. अशा या संस्थेची माहिती सर्वसामान्यांना फारशी नसते. ही माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी इस्त्रोची स्पेस ऑन व्हिल्स ही बस (मोटारगाडी) असून इंडियन सायन्स काँग्रेसमधील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.            भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या मोहीमांची व आतापर्यंतच्या अंतराळ प्रवासाची माहिती ही या गाडीच्या माध्यमातून देण्यात आली आहे. यात चांद्रयान-1 मोहीम, मंगलयान मोहीम, अवकाशात सोडलेले विविध उपग्रह तसेच इस्त्रोच्या एकूणच आतापर्यंतचा अंतराळ प्रवास या गाडीमध्ये आपल्याला पहायला मिळणार आहे. चांद्रयान व मंगलयान मोहीम राबविण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन, मोहीमेची माहिती तसेच ही मोहीम राबविताना आलेली आव्हाने याची माहिती देण्यात आली आहे. यासोबतच या गाडीत लावलेल्या एका स्क्रीनच्या माध्यमातून इस्त्रोचा प्रारंभापासून ते आतापर्यंतचा अंतराळ प्रवास विशद करण्यात आला आहे. आयआरएस सॅटेलाईटच्या माध्यमातून जगातील काही शहरांची छायाचित्रे घेण्यात आली आहेत, ती शहरे अंतराळातून कशी दिसतात हे सचित्र येथे पहायला मिळते. यात व्हॅटिकन सिटी, दोहा, दुबई, वॅाशिंग्टन या शहरांचा समावेश आहे.

सर्वसामान्यांना इस्त्रो या संस्थेची माहिती व्हावी यासाठी या विज्ञान परिषदेत स्पेस आन व्हिल्स ठेवण्याचा उद्देश आहे. विशेषतः तरुणांमध्ये विज्ञानाविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न आहे. देशातील अत्यंत महत्वपूर्ण अशा विज्ञानविषयक प्रदर्शनात ही गाडी असल्याचे इस्त्रोच्या शास्त्रज्ञ जयती विजयवर्गीय यांनी सांगितले.

विशेषतः तरुणाईचा अत्यंत उस्फूर्त असा प्रतिसाद स्पेस आन व्हिल्सला मिळत आहे. कोलकाता येथून आलेल्या सौम्या चक्रवर्ती यांनी सांगितले की, स्पेस आन व्हिल्सच्या माध्यमातून इस्त्रोच्या संशोधन गाथा आपल्यापुढे सचित्र पहायला मिळते. इस्त्रोचे न उलगडलेले अनेक पैलू यामाध्यमातून पुढे आले असल्याचे तिने सांगितले.

अमरावती येथून आलेला अतुल ठाकरे म्हणाला की, इंडियन सायन्स काँग्रेसचे आयोजन विदर्भातील नागपूर शहरात होत असल्याचा विशेष आनंद आहे. पहिल्यांदा अशाप्रकारच्या विज्ञान प्रदर्शनाला भेट दिली आहे. स्पेस आन व्हिल्स हा अत्यंत चांगला माहितीपर उपक्रम आहे.

इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये विज्ञान चर्चासत्रे आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. मात्र, यात सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे ती इस्त्रोची स्पेस ऑन व्हिल्स ही गाडी!

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नवीन वर्षाचा दृढ संकल्प करून पक्षाला मजबूत करूया - खासदार प्रफुल पटेल

Tue Jan 3 , 2023
नागपूर :-नवीन वर्ष २०२३ च्या पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मंगलमय शुभेच्छा देऊन पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नंबर एक करण्याचा दृढ संकल्प करावा तसेच पक्ष मजबूत करण्यासाठी पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार प्रफुल पटेल यांनी केले आज नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरूदेव सेवा आश्रम, नागपुर येथे नववर्ष 2023 निमित्त पक्ष पदाधिकारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com