– अमेरिकेचे श्रीकृष्ण चैतन्य स्वामी महाराज यांची प्रमुख उपस्थिती
नागपूर :- आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) चे संस्थापकाचार्य ए. सी. भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांचे प्रिय शिष्य श्रील लोकनाथ स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनात इस्कॉनचे नागपूर केंद्र असलेल्या श्री श्री राधा गोपीनाथ मंदिर, एम्प्रेस मॉल येथे इस्कॉन जगन्नाथ रथयात्रेचे आज, ८ जुलै २०२४ रोजी दुपारी १२ वाजता आयोजन करण्यात आले आहे.
पोद्दारेश्वर राम मंदिर (मेयो हॉस्पिटल चौक) येथून रथयात्रेला प्रारंभ होणार असून तत्पूर्वी, सकाळी १० वाजता श्री श्री राधा गोपीनाथ मंदिरात भगवान श्री जगन्नाथ भाई बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांना ५६ भोग अर्पण केला जाईल. तेथून तीन विग्रह कार व मोटारसायकल रॅली द्वारे त्यांना यात्रेच्या प्रारंभस्थळी आणले जाईल व तेथून भगवंत एका विशाल रथावर विराजमान होतील.
त्यानंतर श्री लोकनाथ स्वामी महाराज यांचे संन्यासी शिष्य व या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे न्यूयॉर्क (अमेरिका) येथील रहिवासी श्रीकृष्ण चैतन्य स्वामी महाराज यांच्या हस्ते महाआरती होणार आहे. त्यांच्या आशीर्वचनानंतर रथयात्रेला हिरवी झेंडी दाखवण्यात येणार आहे.
इस्कॉन नागपूरचे प्रवक्ते डॉ. श्यामसुंदर शर्मा यांनी सविस्तर माहिती देताना सांगितले की, संपूर्ण रस्त्यावर यजमान, पाहुणे, आजीवन सदस्यांद्वारे भगवतांच्या स्वागतासाठी आरती आदींची व्यवस्था करण्यात आली आहे.
ही रथयात्रा पोद्दारेश्वर राम मंदिर येथून सुरू होऊन दोसर वैश्य भवन चौक, गीतांजली चौक, अग्रसेन चौक, गांधी बाग, स्वामी वल्लभाचार्य चौक (नंगा पुतळा), खुळे चौक, न्यू इतवारी रोड, गांधी पुतळा, बच्छराज व्यास चौक (बडकस चौक), चिटणवीस पार्क, टिळक पुतळा, थाडेश्वर राम मंदिर, आग्याराम देवी चौक, कॉटन मार्केट चौक, फुले मार्केट, एम्प्रेस मॉल मार्गे श्री श्री राधा गोपीनाथ येथील मंदिरात पोहोचेल. तेथे परत एकदा भगवंताला 56 भोग लावून महाआरती होणार आहे.
भगवान श्री जगन्नाथाचा रथ ओढून भक्तांनी आपले जीवन सार्थक करावे, असे आवाहन मंदिराचे अध्यक्ष सच्चिदानंद प्रभू व रीजनल सेक्रेटरी असिस्टेंट (RSA) हरि कीर्तन प्रभू यांनी नागपूर शहरातील सर्व आजीवन सदस्य व रहिवाशांना केले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंदिर उपाध्यक्ष व्रजेंद्रतनय दास, श्रीपंढरीनाथ दास, विशाल दास, साधना भक्ती-माताजी, वेणुगोपाल दास, प्राणनाथ दास, परम करुणा दास, सचितनय गौर दास, आशिष खंडेलवाल प्रभू, कपिल प्रभू, सुदामा प्रभू, नरहरी ठाकूर प्रभू, आराध्य भगवान प्रभू, नित्यानंद चैतन्य प्रभू, कपिलप्रभू, अनमोल प्रभू यांच्यासह अनेक भाविकांचे सहकार्य लाभत आहे.
– डॉ श्यामसुंदर शर्मा प्रवक्ता इस्कॉन, नागपुर