नागपूर :- दि. १७ ऑक्टो – बौद्ध पुनर्वसन व संरक्षण समिती महाराष्ट्र यांच्या वतीने भैयाजी खैरकर यांनी पत्रपरिषद संबोधित करते वेळी, दीक्षाभूमीवर यंदा बौद्ध विचारांच्या नेत्यांनाच आमंत्रित करा असं वक्तव्य परिषदेत केले. स्मारक समितीने जर बुद्ध आंबेडकर विचारधारेच्या विरोधातील लोकांना बोलावले तर त्यांच्याकडून त्रिशरण पंचशील सोबतच 22 प्रतिज्ञाचे पठण करून घ्यावे असे मत यावेळी उत्तम शेवडे यांनी व्यक्त केले.
धम्मदीक्षेच्या क्रांती पर्वाला आज 67 वर्ष पूर्ण होत आहे. या 67 वर्षात बौद्धांनी कुठली उंची गाठली की, नीती चक्रा प्रमाणे हा समाज होता. हा तेथेच पूर्वपदावर उभा आहे. याची समीक्षा करण्याची गरज निर्माण झाली आहे. बौद्ध विचारावंतानी या दिनानिमित्ताने विचार करावा असे आम्हाला वाटते, बौद्ध समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी जिवाचे रान करणाऱ्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसमोर मात्र वेगळी चिंता आहे ती म्हणजे दीक्षाभूमी ही सर्व प्रकारच्या आणि विविध चळवळीचे मुख्य केंद्र व्हावे असे वाटत असतानाच त्या दिशेने प्रयत्न होताना मात्र दिसत नाही आज केवळ महोत्सवी स्वरूप आल्याचे दिसते. एक काळ आम्ही तोही पाहिला ! जेव्हा येथे स्तूप नव्हते कोणत्याही सोई नव्हत्या पण आंबेडकर अनुयायी काखेत लेकरू आणि डोक्यावर शिदोरी घेऊन दीक्षाभूमीवर येत होती. आंबेडकरी विचाराने भारावलेले कव्वाल रात्रभर कव्वाल्या म्हणत आणि आंबेडकरी अनुयायी निष्ठापूर्वक भिमाच्या विचारांची गाणी ऐकत असत. कोणताही कवाल मग तो कृष्णा शिंदे असो वा प्रल्हाद शिंदे असो अथवा गोविंद मशीलकर राजानंद गडपायले असो ही सारी कलावंत मंडळी पहाटेपर्यंत दीक्षाभूमीवर गाणी गात होते. यांच्या तोंडून चुकूनही बाबासाहेबांच्या चळवळीच्या व्यतीरिक्त एकही शब्द बाहेर पडत नव्हता. दिक्षाभूमीवर आलेला गरीब आणि सामान्य माणूस बाबासाहेबांचे विचार घेऊनच घरी जात होता.
दीक्षाभूमी ही केवळ इतरांसारखी मैदानभूमी नसून ती प्रेरणादायी आहे. हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. या भूमीवरील माती काळी नसून ती निळी आहे. या निळ्या मातीत बाबासाहेबांनी बुद्ध विचारांचे बीजे पेरली आहेत. त्यामुळे या भूमीवर उगवलेले बुद्ध विचारांची रोपटे आम्हाला जगवायचे आहे. या रोपट्याला खतपाणी घालणे, जतन करणे आणि महावृक्षात रूपांतरित करणे प्रत्येक बौद्ध कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. हे सारे मांडायचे कारण की, आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना काही धोके / अडचणी दिसत आहे. आम्ही वेळीच सावध होणे हे आमचे कर्तव्य आहे. दिक्षाभूमीवर काही विपरीत विचारांची लोक ज्यांचा विरोध बाबासाहेबांनी आयुष्यभर केला त्यांचे अतिक्रमण या ना त्या मार्गाने दिक्षाभुमीवर होत आहे. हे वैचारिक अतिक्रमण थांबवणे काळाची गरज आहे.
यंदा 67 व्या धम्मदीक्षा सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बौद्ध विचारसरणीचे बांधिलकी असणाऱ्या बौद्ध नेत्यांनाच आमंत्रित करण्यात यावे. अशी मागणी आम्ही या निवेदनाद्वारे करत आहोत. दीक्षाभूमीवर यंदा संघ विचारसरणीच्या लोकांना मुख्य अतिथी म्हणून बोलवण्यात येत असल्याचे समजते, बाबासाहेबांचा लढा हा संघ विचारसरणी विरोधात आयुष्यभर राहिला. त्यामुळे बाबासाहेबांनी या भूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा आपल्या लाखो अनुयायांना दिली. त्या भूमीवर बौद्ध नेत्यांना वगळून संघ विचारसरणीच्या पुढाऱ्यांना बोलवण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
असे झाले तर बौद्धगया, चिंचोली यासारख्या संस्था या संघाच्या घशात गेल्या, तीच स्थिती दीक्षाभूमीची झाल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी बौद्ध धम्माच्या चळवळीसाठी मोठे योगदान दिले. असे मल्लिकार्जुन खरगे, बाबासाहेबांचे नातू आणि बौद्धांचे नेते प्रकाश आंबेडकर, बहुजन नेत्या मायावती यांच्यासारखी बरीच मंडळी बौद्ध समाजात आहे. राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून या नेत्यांना आमंत्रित करून दीक्षाभूमीचे भगवेकरण थांबवावे असे आवाहन ही आम्ही या निवेदनाद्वारे करीत आहोत.
भविष्यातही या गोष्टींची दखल घेऊन दीक्षाभूमीवरील संघाच्या छुप्या समर्थकांना बाहेरचा रस्ता दाखवून दीक्षाभूमीचे शुद्धीकरण करावे. अशी मागणी पत्रपरिषदेत भैय्याजी खैरकर, उत्तम शेवडे, प्रदीप मून, नरेश गायकवाड, विनोद आटे, प्रा प्रशांत डेकाटे, चित्रकार सुरेश मून, दीपाली शिंगारे, चंद्रशेखर कांबळे, कमलताई भगत, ममता ताई मून, अनिल कुमार नागबौद्ध, सुनील सोनटक्के विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.