– तंत्रज्ञानामुळे सर्वसामान्यांच्या प्रगतीसह भ्रष्टाचाराला आळा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– रामदेवबाबा विद्यापीठातील डिजिटल टॉवरचे लोकार्पण
– राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची विशेष उपस्थिती
नागपूर :- भारताला एकेकाळी एकेकाळी स्लिपिंग जायंट म्हणून ओळखल्या जायचे. ती ओळख आता आपण पूर्णतः पुसून काढली असून तंत्रकौशल्यात एक मैलाचा टप्पा आपण गाठला आहे. शिक्षणापासून ते डिजीटल तंत्रज्ञानापर्यंत आपण साध्य केलेली प्रगती ही लोकशाहीच्या भवितव्याला अधिक उज्ज्वल करणारी असल्याचे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.
रामदेवबाबा विद्यापीठातील डिजिटल टॉवरच्या कोनशिलेचे अनावरण व लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित विशेष समारंभात उपराष्ट्रपती जगदीप धनखड बोलत होते. यावेळी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, रामदेवबाबा सार्वजनिक समितीचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल, चान्सलर डॉ एस एस मंथा, कुलगुरू डॉ आर एस पांडे, सचिव राजेंद्र पुरोहित व मान्यवर उपस्थित होते.
आज जागतिक लोकशाही दिन आपण साजरा करीत आहोत याचा धागा पकडून त्यांनी लोकशाहीच्या सशक्तीकरणात गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षण ही सेवा आहे. सामाजिक उत्तरदायित्वाचे यात भान आहे. शिक्षणाच्या व्यवसायापेक्षा नैतिकतेला, आदर्श विद्यार्थी घडवायला रामदेवबाबा शिक्षण संस्थेने आजवर दिलेल्या योगदानाचा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी गौरव केला.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, ब्लॉकचेन यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे महत्व उपराष्ट्रपती धनखड यांनी विषद केले. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आव्हाने आणि संधी दोन्ही निर्माण होत असतात. हीच आव्हाने संधीत रुपांतरित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले. क्वांटम कॉम्प्युटिंग आणि ग्रीन हायड्रोजन यासारखे तंत्रज्ञान हे गेम चेंजर ठरणार असल्याचे ते म्हणाले.
डिजिटल तंत्रज्ञानामुळे सर्वसामान्यांच्या प्रगतीसह भ्रष्टाचाराला आळा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्त्वात भारताची पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थाकडे वेगाने वाटचाल सुरू आहे. जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे पहिले जात आहे. प्रगतीच्या या प्रवासात डिजिटल इकॉनॉमिचे अनन्य साधारण महत्त्व आहे. यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभार्थ्यांना दिला जाणारा लाभ हा याच डिजिटल क्रांतीमुळे कोणत्याही मध्यस्थाविना सरळ त्याच्या खात्यात जमा होत आहे. जगाच्या तुलनेत आपण साध्य केलेल्या लक्षणीय प्रगतीकडे सर्व देश आश्चर्याने पाहात असल्याचे ते म्हणाले.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचे नवे प्रवेशद्वार खुले झाले आहे. यात अनेक संधी दडलेल्या आहेत. खेड्यापाड्यात हे तंत्रज्ञान आता रुजले असून आपल्याला आता कुशल मनुष्यबळाची गरज आहे. यासाठी विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
रामदेवबाबा सारख्या त्यागावर उभारलेल्या संस्थेतून येणारी विद्यार्थी हे देशाच्या प्रगतीला मोलाचा हातभार लावतील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
अभियांत्रिकेच्या तीन शेडमध्ये सुरू झालेल्या रामदेव बाबा महाविद्यालयाचा प्रवास हा येथील शिक्षकांनी विद्यापीठाच्या निर्मितीपर्यंत आणल्याचे भाऊक उद्गार माजी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी काढले. येथील ३०० प्राध्यापक उच्च गुणवत्ताधारक असून २०० अध्यापक हे डॉक्टरेट असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. महात्मा गांधी यांनी सांगितलेल्या साध्या जीवनाची शिकवण विद्यार्थ्यांना देण्याचा आम्ही प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले. यावेळी रामदेवबाबा सार्वजनिक समितीचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांनी मनोगत व्यक्त केले.
तत्पूर्वी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि त्यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांच्या हस्ते विद्यापीठ परिसरात ‘एक पेड मन के नाम’ अभियानांतर्गत वृक्षारोपण केले. मान्यवरांच्या हस्ते रामदेवबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.