भारतीय विज्ञान काँग्रेसः आनंदीबाई जोशी ते कांदबिनी गांगुली

महिला शास्त्रज्ञांच्या माहितीचे विज्ञान यात्रींना अप्रूप

नागपूर, दि. 5 :– देशाच्या सर्वच क्षेत्रात महिलांचे योगदान आहे. विज्ञान क्षेत्रही त्याला अपवाद नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरात असलेल्या ‘प्राईड ऑफ इंडिया’ या प्रदर्शनात ‘आनंदीबाई जोशी ते कादंबिनी गांगुली’ या महिला शास्त्रज्ञांचा जीवनपट मांडण्यात आलाय. भारतीय विज्ञान काँग्रेसला भेट देणाऱ्या प्रत्येक विज्ञान यात्रीला या माहितीचे अप्रूप वाटत आहे. महिला शास्त्रज्ञांबद्दल माहिती देणाऱ्या या प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांची वाढती गर्दी ह्याचेच द्योतक आहे.

यंदाची भारतीय विज्ञान काँग्रेस ही ‘महिला सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ या संकल्पनेवर केंद्रित आहे. यामध्ये ‘शाश्वत विकास, महिला सक्षमीकरण आणि हे साध्य करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भूमिका’, या विषयावर विशेषत्वाने चर्चा होत आहे. या अनुषंगाने महिला वैज्ञानिकांचा जीवनपट मांडणारे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर अशा दोन्ही कालखंडात विज्ञान क्षेत्रात महिलांनी दिलेल्या योगदानाबद्दल या प्रदर्शनातून माहिती देण्यात आली आहे. ‘हॉल ऑफ प्राईड’ या हॅाल मध्ये असलेल्या या प्रदर्शनात आनंदीबाई जोशी, केतायुन अर्देशिर दिनशॅा, बिमला बुटी, इरावती कर्वे, असीमा चॅटर्जी, डॅा. जानकी अम्माल, अन्ना मणी, कमल रणदिवे, डॅा. विभा चौधरी, कादंबिनी गांगुली, मेरी पूनन लुकोस, कमल रणदिवे या विज्ञान क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिला वैज्ञानिकांच्या माहितीचा समावेश आहे.

महत्वपूर्ण अशी माहिती सोप्या भाषेत या प्रदर्शनात पहावयास मिळते. कर्करोगतज्ज्ञ केतायुन अर्देशिर दिनशॅा यांनी वैद्यकीय क्षेत्रात विशेषतः कर्करोग या आजारावरील रेडिएशन थेरपीवर केलेल्या संशोधनाची माहिती इथे देण्यात आली आहे.

पहिल्या भारतीय महिला रसायनशास्त्रज्ञ असीमा चॅटर्जी या विज्ञान विदुषींची माहिती या प्रदर्शनीत देण्यात आली आहे. भारतीय औषधी वनस्पतींवर त्यांनी विपुल संशोधन केले. त्यांना ‘पहिल्या भारतीय महिला रसायनशास्त्रज्ञ’ असे संबोधले जाते. रसायनशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण घेऊन ‘डॉक्टरेट इन सायन्स’ पदवी संपादन करीत त्यांनी अमेरिकेत जाऊन संशोधन केले. भारताचे नोबेल पारितोषिक समजले जाणारे शांतीस्वरूप भटनागर पारितोषिक मिळवले. भारतीय विज्ञान काँग्रेसचे अध्यक्षपद भुषवले. त्यांना ‘पद्मभूषण’ किताबाने सन्मानित करण्यात आले.

डॉ. जानकी अम्मल यांची विशेष ओळख म्हणजे त्या भारतातील पहिल्या महिला वनस्पतिशास्त्रज्ञ. वनस्पतिशास्त्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारने १९७७ मध्ये पद्मश्री सन्मान देऊन गौरवले.

भारताच्या ‘वेदर वुमन’ म्हणून अण्णा मणी ओळखल्या जातात. भारतीय हवामान निरीक्षण यंत्रांच्या रचनेत अ‍ॅना मणी यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी बनवलेली हवामान निरीक्षण यंत्रे भारतातील हवामानाच्या पैलूंचे मोजमाप करण्यात आणि अंदाज व्यक्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

यासोबतच बिमला बुटी, इरावती कर्वे, कमल रणदिवे, आंनदी गोपाळ जोशी, डॉ. विभा चौधरी, कादंबिनी गांगुली, मेरी पूनन लुकोस, कमल रणदिवे या विदुषींनी विज्ञान क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाची प्रेरणादायी माहिती या प्रदर्शनात बघायला, वाचायला मिळते. तसेच विज्ञान क्षेत्रात इतर देशांच्या तुलनेत देशातील महिला शास्त्रज्ञांचे प्रमाण, अंतराळ संशोधन क्षेत्रातील महिलांचे योगदान यासह इतरही रंजक माहिती या प्रदर्शनात पहावयास मिळते. प्रत्येकाने अवश्य भेट द्यावे, असे हे दालन आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या १२६ प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

Thu Jan 5 , 2023
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवार (४) रोजी उपद्रव शोध पथकाने १२६ प्रकरणांची नोंद करून ५२००० रुपयाचा दंड वसूल केला. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com