– सायबर गुन्हेगाराने अडविले आमिषाच्या जाळ्यात : गुन्हा दखल
नागपूर :- शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये आमिषाला बळी पडून शहरातील एका व्यक्तीने ९ लाख ९८ हजार गमावले. सायबर गुन्हेगाराने फेकलेल्या नफ्याच्या जाळ्यात अडक ल्याने हातची रक्कम निसटली. आधी आरोपीने गुंतवणुकीवर चारपट नफा दर्शविला. मग, मोठी रक्कम हाती लागताच पोबारा केला. तहसील पोलिस ठाण्यांतर्गत ही घटना घडली. मोहम्मद जाबीर मोहम्मद साबीर असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मोमीनपुरा येथील अंसारनगर आंबेडकर भवनजवळ राहणारे मोहम्मद जाबीर मोहम्मद साबीर (३४) हे स्वत: शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात. १ ते ७ एप्रिल दरम्यान, त्यांना आरोपी दिल्ली येथे राहणारी आरोपी निशा पटेल हिने त्यांच्या मोबाईलवर एक लिंक पाठविली. त्यानंतर शेअर्स खरेदी विक्रीकरिता केकेआर इंन्वेस्टमेंट स्ट्रॅटेजी अॅनॉलिस्ट या व्हॉस्टअॅप ग्रुपशी जोडले. त्यानंतर तिने मो. जाबीर यांना स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला. निशाच्या सांगण्याप्रमाणे गुंतवणूक केल्यानंतर मो. जाबीर यांना चारपट नफा मिळाला. निशाच्या सांगण्यावरून केलेल्या गुंतवणुकीत मिळालेला मोठा नफा बघता त्यांचा तिच्यावर चांगलाच विश्वास बसला. ही बाब हेरत निशाने मो. जाबीर यांच्यावर मोठ्या नफ्याचे जाळे फेकले. यात फिर्यादी अडकल्याचे बघता निशाने त्यांना वेगवेगळ्या कंपनीचे शेअर्स खरेदी व विक्री करायला लावले. या व्यवहारासाठी मो. जाबीर यांनी आरोपीच्या वेगवेगळ्या खात्यावर एकूण ९ लाख ९८ हजारांची रक्कम पाठविली. मोठी रक्कम हाती लागताच आरोपीने पोबारा केला. मो. जाबरी यांनी रक्कम परत मागितली असता ती परत न करात त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून तहसील पोलिसांनी आरोपी विरूध्द कलम ४०६,४१९,४२० भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे.