नागपूर :-गवती कुरण ही महत्वाची परिसंस्था असून प्राणीमात्रांच्या अन्नसाखळीचा महत्वाचा भाग आहेत. पर्यावरणाचा –-हास थांबवायचा असेल, पृथ्वीला वाचावायचे असेल कुरणांचा मोठ्या प्रमाणात विकास होणे गरजेचे असून त्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे, असे मत महाराष्ट्र राज्य वनसंरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना नागपूरचे अध्यक्ष अजय पाटील यांनी व्यक्त केले.
वनराई फाउंडेशन नागपूरतर्फे ‘संरक्षित वनक्षेत्रात कुरण विकास व्यवस्थापन’ विषयावर अजय पाटील यांचे रविवारी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रशांत कडू होते. राष्ट्रभाषा संकुलातील शंकरराव देव संवाद कक्षात झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रभाषा परिवारचे डॉ. पिनाक दंदे, निलेश खांडेकर यांची उपस्थिती होती.
मोकळ्या जागी, पाणस्थळ, जुन्या कुरणाच्या जागी आणि तणबाधित जागी कुरण निर्माण केला जाऊ शकते, असे सांगताना अजय पाटील यांनी कुरणाचा विकास करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याचीही माहिती त्यांनी दिली. संरक्षित क्षेत्रात कुरण विकास करण्याची गरज असून त्याकरिता या क्षेत्रात काम करणा-या क्षेत्रीय अधिकारी, कर्मचा-यांनी प्रशिक्षण देण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.
प्रशांत कडू अध्यक्षीय भाषण करताना म्हणाले, वनांचा -हास थांबवणे ही केवळ वनविभागाची जबाबदारी नसून त्याकरिता प्रत्येकाने समोर येणे गरजेचे आहे. कुरण विकासाचा विषय लोकापर्यंत पोहोचण्यासाठी हे उत्तम व्यासपीठ असून विद्यार्थ्यासाठी त्यासंदर्भात कार्यशाळादेखील घेता येणे शक्य आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन जतकर यांनी केले तर निलेश खांडेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला बाळासाहेब कुळकर्णी, अतुल दुरुगकर, शिल्पाली भालेराव, आनंद तिडके, प्रकाश इटनकर, शुभांकर पाटील, सलोनी बागवानी, संस्कृती पाटील आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.