दीक्षाभूमी येथील मनपा नियंत्रण कक्षाचे लोकार्पण

– मान्यवरांच्या हस्ते माहिती पुस्तकाचे अनावरण

नागपूर :- धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पवित्र दीक्षाभूमीवर देशभरातून लाखो अनुयायी अभिवादनास येतात.अनुयायांना कसल्याही प्रकारची असुविधा होऊ नये याकरिता नागपूर महानगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाचे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त  आंचल गोयल यांच्या हस्ते लोकार्पण व माहिती पुस्तकाचे अनावरण करण्यात आले.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांच्या सुविधेसाठी मनपातर्फे साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ मनपा नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहे.

या कक्षाच्या लोकार्पण प्रसंगी सर्वश्री मुख्य अभियंता राजीव गायकवाड उपायुक्त रविंद्र भेलावे,उपायुक्त घनकचरा व्‍यवस्थापन विभाग संचालक तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले,सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता अजय मानकर, मुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ विजय जोशी, कार्यकारी अभियंता रवींद्र बुंधाडे, श्रीकांत वाईकर यांच्यासह उपद्रव शोध पथकाचे जवान, मनपा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

धम्मचक्र प्रवर्तन दिन मुख्य समारंभ आणि इतर दिवशी देखील दीक्षाभूमीवर येणा-या बौद्ध अनुयायांची सुविधा आणि आरोग्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा पूर्णत: सज्ज झालेली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी यांनी संपूर्ण व्यवस्थेचा आढावा घेउन मुलभूत सुविधांमध्ये त्रुटी राहू नयेत याची काळजी घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी दीक्षाभूमी परिसराची पाहणी करीत व्यवस्थेचा आढावा घेतला. या प्रसंगी त्यांनी परिवहन विभागाच्या नियंत्रण कक्षाला भेट देत उपायुक्त सुरेश बगळे यांच्याकडून माहिती जाणून घेतली.

२४ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तनाचा मुख्य समारंभ होणार आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दीक्षाभूमीवर येणा-या बौद्ध अनुयायांच्या संख्या लक्षात घेता २२ ते २५ ऑक्टोबर या कालावधीमध्ये नागपूर महानगरपालिकेद्वारे दीक्षाभूमीवर अनुयायांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दीक्षाभूमीवर येणा-या मार्गावर चार ठिकाणी मनपाचे आरोग्य तपासणी केंद्र, २४ तास रुग्णवाहिका, पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था, स्वच्छतेसाठी ६००च्या वर सफाई कर्मचा-यांची नियुक्ती, मदतीसाठी साहित्यभूषण अण्णाभाउ साठे स्मारकाजवळ नियंत्रण कक्ष, अग्निशमन पथक, शौचालयांची व्यवस्था, निवारा व्यवस्था, प्रकाश व्यवस्था, सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे, परिवहन व्यवस्था आदी सर्व सुविधा मनपाद्वारे दीक्षाभूमीवर येणा-या बौद्ध अनुयायांसाठी करण्यात येत आहे.

दीक्षाभूमीकडे येणा-या मार्गांवर ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावले जात आहेत. याशिवाय बाहेरून येणा-या अनुयायांना दीक्षाभूमीवर येण्यासाठी किंवा कामठी येथील ड्रॅगन पॅलेसला जाण्यासाठी मनपाच्या परिवहन विभागाद्वारे विशेष ‘आपली बस’ ची व्यवस्था करण्यात आली आहे. दीक्षाभूमी परिसरामध्ये सतत स्वच्छता राखली जाईल यासाठी ठिकठिकाणी कचरा कुंडींची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शिवाय तीन पाळीमध्ये एकूण ६६४ स्वच्छता कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच एकूण एक हजार कर्मचारी सेवेत तैनात आहेत. दीक्षाभूमी मार्गावर पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी १४० नळांची व्यवस्था करण्यात आली आहे. माता कचेरी परिसर आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय) येथे निवारा / विश्रांती गृहाची निर्मिती मनपाद्वारे करण्यात येत आहे. याशिवाय आपात्कालीन स्थितीमध्ये दीक्षाभूमी जवळील शाळांमध्ये निवारा व्यवस्था करण्यात येणार आहे.

मुलभूत सुविधांमध्ये महिला आणि पुरूषांसाठी ९०० पेक्षा अधिक स्वतंत्र प्रसाधन गृहांची व्यवस्था आयटीआय परिसर, दीक्षाभूमी परिसर आणि मध्यवर्ती कारागृहाच्या जागेमध्ये करण्यात आलेली आहे. नागरिकांना आवश्यक सुविधा आणि त्यांना भेडसावणा-या अडचणी सोडविण्यासाठी साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक शेजारी मनपाचे नियंत्रण कक्ष उभारण्यात येत असून हे कक्ष २४ तास कार्यरत असणार आहे. तसेच नियंत्रण कक्ष येथिल दूरध्वनी क्रमांक – 0712/2432998 नागरिकाच्या सेवेत सुरू करण्यात आला आहे.

दीक्षाभूमीवर येणा-या सर्व बौद्ध अनुयायांना सुविधा प्रदान करण्यासाठी मनपाची संपूर्ण यंत्रणा सज्ज झालेली आहे. दीक्षाभूमीवर येणा-या सर्व नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा. संपूर्ण दीक्षाभूमी परिसर प्लास्टिकमुक्त घोषित करण्यात आलेला असून नागरिकांनी प्लास्टिक वस्तूंचा वापर टाळावा. परिसरात स्वच्छतेसाठी स्वच्छता कर्मचारी सेवारत राहणार आहेत. नागरिकांनी देखील आपली जबाबदारी ओळखून कुठेही कचरा होणार नाही याची काळजी घ्यावी. इतरत्र कुठेही कचरा न टाकता तो परिसरातील कचराकुंडीमध्ये टाकावा व मनपा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. या प्रसंगी जितेंद्र सिंह तोमर, रामभाऊ तिडके यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यस्तर शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेचा समारोप

Sun Oct 22 , 2023
– महाराष्ट्राचा संघ जाहीर नागपूर :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परीषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा सॉफ्टबॉल संघटना यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तर शालेय सॉफ्टबॉल (17 वर्षे मुले व मुली) क्रीडा स्पर्धा सन 2023-24 या स्पर्धेचे आयोजन दि. 16 ते 19 ऑक्टोबर या कालावधीत विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर आयोजन करण्यात आले होते. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!