मालपेवाडी येथे पुस्तकांचे गाव विस्तार योजनेचा शुभारंभ पुस्तकांच्या दालनांना मराठी साहित्य प्रेमींनी अवश्य भेट द्यावी – मंत्री दीपक केसरकर

मुंबई :- ‘पुस्तकांचे गाव’ या योजनेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा विस्तार करण्यात येत असून मालपेवाडी येथे सुरू झालेल्या पुस्तकाच्या दालनाला मराठी भाषा प्रेमींनी अवश्य भेट द्यावी, असे आवाहन शालेय शिक्षण आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केले. पुस्तकांच्या गावांना परदेशी पर्यटकही भेट देतील हे लक्षात घेऊन आणि त्यांच्यापर्यंत मराठी साहित्य पोहोचावे यासाठी महत्त्वाच्या मराठी पुस्तकांच्या इंग्रजी अनुवादांची श्राव्य पुस्तके उपलब्ध करून द्यावीत, अशी सूचना त्यांनी केली.

‘हे ऑन वे’ या वेल्स (इंग्लंड) मधील पुस्तकाच्या गावाच्या धर्तीवरील संकल्पनेनुसार राज्यात साकारलेल्या ‘पुस्तकांचे गाव’ योजनेचा विस्तार करण्यात येत आहे. याअंतर्गत सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यातील मालपेवाडी, पोंभुर्ले या पहिल्या गावातील पुस्तक-दालनाचे उद्घाटन मंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते रविवारी झाले. मालपेवाडी येथे प्रातिनिधीक स्वरूपात मालपे ॲग्रो टुरिझम यांच्या कार्यालयात पुस्तक दालन तयार करण्यात आले असून पुढील काळात गावातील अन्य ठिकाणीही पुस्तकांची दालने सुरू करण्यात येणार आहेत.

वाचकांना दर्जेदार पुस्तके उपलब्ध व्हावीत यासाठी राज्य मराठी विकास संस्थेद्वारे साहित्याचे जाणकार आणि तज्ज्ञ वाचक यांची पुस्तक निवड समिती गठित करण्यात आली आहे. या समितीद्वारे पुस्तकांची निवड करण्यात येऊन विविध साहित्य प्रकारांनुसार तसेच सर्वकाळ लोकप्रिय असणारी पुस्तके या दालनांमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मराठी साहित्याचे वाचक व अभ्यासक या ग्रंथदालनाचा लाभ घेऊ शकतील. पुढील काळात वेरुळ, नवेगाव बांध आणि अंकलखोप येथेही पुस्तकांचे गाव उभारण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. लवकरच ही गावेही वाचक-पर्यटकांसाठी सुरू होतील, अशी माहिती राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ.शामकांत देवरे यांनी दिली.

मालपेवाडी येथील दालनाच्या उद्घाटन प्रसंगी माणुसकी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद मालपेकर, संस्थेच्या नियामक मंडळाच्या आणि या प्रकल्पाच्या पुस्तक निवड समितीच्या सदस्य रेखा दिघे, देवगडचे तहसीलदार जनार्दन साहिले, पोंभुर्ले येथील स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आप्पा बेलवलकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत 72 हजार लाभार्थ्यांना 16.20 कोटी निधी - आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे

Tue Mar 12 , 2024
– मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत १० हजार लाभार्थ्यांना २६.८६ कोटी निधी जमा मुंबई :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत ७२ हजार पाच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये १६.२० कोटी एवढा निधी जमा करण्यात आला आहे. तसेच केंद्र शासनाच्या मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत कोरोनाच्या संसर्गामुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या १० हजार २९० लाभार्थ्यांना २९०० प्रमाणे नऊ महिन्यासाठीचा रूपये २६.८६ कोटी एवढा निधी जमा करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com