– नक्षलग्रस्त भागातून आरोपी गजाआड
– 402 गुन्ह्यातील मुद्देमाल केला परत
नागपूर :- रेल्वे म्हणजे अद्भूत विश्व. या विश्वात सारेच हरवून जातात. धड धड करत येणार्या गाडीत प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. आरोपी याच संधीचा फायदा घेत प्रवाशांच्या मौल्यावान वस्तू पळवितात. प्रवाशांचे सामान चोरणार्या टोळ्या भारतीय रेल्वेत सक्रीय आहेत. मात्र, लोहमार्ग नागपूर पोलिसांच्या पथकाने देशाच्या विविध राज्यात जावून अनेक टोळ्यांचे म्होरके आणि त्यांच्या साथीदारांच्या मुसक्या आवळल्या. 2023 यावर्षात 150 गुन्हेगारांना अटक केले. यातील बहुतांश आरोपींना नक्षलग्रस्त भागातून गजाआड केले आहे.
लोहमार्ग नागपूर परिक्षेत्रात नागपूर, इतवारी, गोंदिया, वर्धा, बडनेरा आणि अकोला असे सहा पोलिस ठाणे येतात. यापैकी नागपूर देशाच्या मध्यभागी असल्याने देशाच्या विविध राज्यात जाणार्या सर्व गाड्या येथून क्रास होतात. या स्थानकावर प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. वर्दळीचा फायदा घेत चोरही सक्रीय असतात. पाकिटमार, मोबाईल चोर, शितपेयात गुंगी येणारी औषधी देवून प्रवाशांना लुटणारे, अंमलीपदार्थाची तस्करी करणारे विविध राज्यातून येतात. अशा गुन्हेगारांनी 2023 या वर्षात 656 गुन्हे केले. यातील 150 गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिस पथकाला यश मिळाले आहे.
लोहमार्ग पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या मादर्शनात आणि लोहमार्ग पोलिस निरीक्षक मनीषा काशीद यांच्या नेतृत्वात विशेष पथकाचे गठण करून नक्षलग्रस्त भाग म्हणजे छत्तीसगढ, ओडीशा, आध्र प्रदेश आदी ठिकाणाहून आरोपींना पकडण्यात आले. जीव धोक्यात घालून पोलिस पथकाने आरोपींच्या गळातून त्यांना अटक केली आहे. नागपुरात गुन्हा घडतो. फिर्यादी दिल्लीचा असतो आणि आरोपी ओडीशाचा. लोहमार्ग पोलिसांचे कार्यक्षेत्र लहान असले तरी गुन्हेगारांच्या शोधासाठी त्यांना देशभरात जावे लागते. पोलिसांची कल्पकता आणि तांत्रिक तपासाच्या आधारे 150 आरोपींना पकडण्यात लोहमार्ग पोलिसांना यश मिळाले आहे.
वर्षभरात दिड कोटींचा मुद्देमाल जप्त
लोहमार्ग पोलिसांनी वर्षभर्यात 253 गुन्ह्यातील एक कोटी 57 लाख 52 हजार 653 रुपये किंमतीचा मुद्देमाल रिकव्हर केला. तांत्रिक तपास करीत देशाच्या विविध राज्यात जावून चोरीच्या वस्तू जप्त केल्या. त्याच प्रमाणे 402 गुन्ह्यातील मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेला मुद्देमाल फिर्यादींना परत केला. फिर्यादी न आल्याने 43 प्रकरणातील मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने नष्ट करण्यात आला.
17 दिवसात 17 मोबाईल जप्त
नवीन वर्षात म्हणजे जानेवारी 2024 मध्ये केवळ 17 दिवसात 17 मोबाईल जप्त करण्यात आले. तसेच 24 गुन्ह्यातील मुद्देमाल नष्ट करण्यात आला. यात 2023 च्या मुद्देमालाचाही समावेश आहे. जप्त मालाची किंमत 2 लाख 57 हजार 380 रुपये आहे.