Ø उमरखेड येथे महसूल मंत्र्यांची आढावा बैठक
Ø वाळू माफीयांवर हद्दपारच्या करावाईचे निर्देश
यवतमाळ :- उमरखेड येथे नगरपरिषदेच्या सभागृहात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. विभागाच्यावतीने सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी अनेक फ्लॅगशिप योजना राबविण्यात येत आहे. या योजनांची चांगली अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
बैठकीला महसूल मंत्र्यांसह आ.किसन वानखेडे, माजी आमदार नामदेव ससाने, जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी, उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख प्रतिक मोकाशी तसेच उमरखेड उपविभागातील सर्व तहसिलदार, नायब तहसिलदार व महसूल विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
महसूल विभागाच्या योजना, उपक्रमांचा लाभ गावकऱ्यांना त्यांच्या गावात एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी गावनिहाय महसूली शिबिरे घेण्यात यावी. या ठिकाणी जास्तीत जास्त नागरिकांना विविध सेवांचा लाभ उपलब्ध करून देण्यात यावा. ॲग्रीस्ट्रॅक अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांची नोंदणी केली जावी. एकही शेतकरी नोंदणीपासून वंचित राहू नये, असे महसूल मंत्री श्री.बावनकुळे यांनी सांगितले. महसूल विभागाच्या विरोधात येणाऱ्या बातम्यांचे खंडन संबंधित अधिकाऱ्याने करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या जमीन मोजणीची प्रकरणे कालमर्यादेत निकाली निघणे आवश्यक आहे. प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्यात यावीत. शहरी आणि ग्रामीण भागात मालमत्ताधारकांना प्रॅापर्टी कार्डचे वाटप लवकरच करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. वाळू चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत असल्याचे दिसून येते. वाळू माफियांची यादी तयार करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासोबतच पोलिस विभागाच्या मदतीने हद्दपारीची कारवाई करण्यात यावी, अशी सूचना त्यांनी केली.
यावेळी त्यांनी उमरखेड विभागातील महसूलच्या विविध बाबींचा आढावा घेतला. वाळू घाट, अवैध रेती वाहतूक, घरकुलांसाठी रेतीची तरतूद, खानपट्टे, ई-फेरफार, ई-चावडी, ॲग्रीस्टॅक, आपले सरकार सेवा केंद्र, राष्ट्रीय महामार्ग व शक्तीपीठ महामार्गाचे भूसंपादन, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदतीची प्रकरणे, विभागातील महसूलच्या ईमारत बांधकामांची स्थिती, अधिकारी, कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, महाराजस्व अभियान, अर्थसहाय्याच्या योजना, केंद्र पुरस्कृत योजना, पीएम किसान, ई-ऑफिस, पट्टे वाटप आदींची माहिती घेऊन सूचना केल्या. आ.किसन वानखेडे यांनी देखील यावेळी काही सूचना केल्या. त्यांच्या सूचनांवर योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.