– राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा
पणजी :-माझ्या वडिलांना हृदयविकाराचा त्रास सुरू झाला होता आणि त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करायची होती. त्यामुळे गेले काही दिवस मला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी अपेक्षेइतका सराव करता आला नाही. पूर्ण सराव झाला असता तर कदाचित मी सुवर्णपदक जिंकले असते, असे तलवारबाजीमधील कांस्यपदक विजेता खेळाडू गिरीश जकाते याने सांगितले.
गिरीश हा सांगली येथील खेळाडू आहे त्याच्या वडिलांचा टेलरिंगचा व्यवसाय आहे. गिरीशने तलवारबाजीमध्ये करिअर करावं यासाठी त्यांनी संपूर्ण सहकार्य दिले आहे. माझ्या आजारपणाकडे लक्ष देऊ नको. स्वतःच्या सरावावर अधिक लक्ष दे असे त्यांनी गिरीशला अनेक वेळा सांगितले होते. पण गिरीशने आपल्या वडिलांच्या आजारपणात त्यांची सेवा केली आणि जमेल तसा सरावही केला. नुकतीच गिरीशच्या वडिलांवर हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली.
गिरीशने एपी गटाच्या वैयक्तिक क्रीडा प्रकारात कांस्यपदक जिंकले आहे. तो सांगली येथील जी ए महाविद्यालयात वाणिज्य शाखेत पदवीधर पदवी अभ्यासक्रमाने शिकत आहे महाविद्यालयाकडून त्याला नेहमीच प्रोत्साहन मिळाले आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवण्याचे त्याचे स्वप्न आहे.