– माजी खासदार संजय निरुपम धावले मीरा रोड येथील फेरीवाल्यांच्या मदतीला.
मुंबई:- मीरा रोड, शांती नगर येथील सेक्टर १ आणि २ येथील शेकडो फेरीवाले मागील ८ महिन्यांपासून स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी आणि हक्कांसाठी महानगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्याविरोधात लढा देत आहेत. या लढाईमध्ये काही फेरीवाले पोलीस प्रशासनाला बळी पडून कारागृहात देखील जाऊन आले आहेत. तरीदेखील त्यांना न्याय मिळत नसल्याने अखेर माजी खासदार संजय निरुपम त्यांच्या मदतीसाठी धावून आले आहेत.
मीरा रोड येथील शांती नगर सेक्टर १ आणि २ येथे १७० फेरीवाले वर्षानुवर्षे आपला व्यवसाय करीत आहेत. फेरीवाला कायदा २०१४ नुसार महानगरपालिकेमार्फत त्यांचे सर्वेक्षण देखील झालेले असून त्यामध्ये ते पात्र ठरविण्यात आले होते. अशा पात्र फेरीवाल्यांना कायद्याचे संरक्षण प्राप्त असल्याने कायद्यानुसार त्यांना हटविण्याआधी पर्यायी जागा देणे अपेक्षित असते. मात्र मीरा भाईंदर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन फेरीवाला कायद्याला केराची टोपली दाखवून केवळ मुस्लिम फेरीवाले म्हणून त्यांना तेथे व्यवसाय करण्यास मज्जाव करीत आहे. या शेकडो फेरीवाल्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने फेरीवाल्यांनी प्रशासनाला न्यायालयात खेचले आहे.
न्यायालयात न्याय मिळण्यास विलंब होते असून फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ आल्याने आझाद हॉकर्स युनियनने मीरा रोड येथे शांती नगर येथील शेकडो फेरीवाल्यांना न्याय देण्यासाठी सभा आयोजित केली होती. या सभेमध्ये संजय निरूपम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी या सर्व फेरीवाल्यांना न्याय मिळवून देण्याचे कबुल केले आहे. आपल्या संविधानाने आणि फेरीवाला कायद्याने हिंदू मुस्लिम असा भेद केला नसताना देखील पोलीस आणि मनपा प्रशासन असा भेद का करीत आहेत असा संतप्त सवाल त्यांनी यावेळेस केला. या फेरीवाल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे देखील त्यांनी यावेळेस स्पष्ट केले. आझाद हॉकर्स युनियनने आयोजित केलेल्या या सभेमध्ये संस्थापक अध्यक्ष दयाशंकर सिंह, सचिव जयशंकर सिंह, लवकुश तिवारी, ऍडव्होकेट कुवर पांडे, नासवी संस्थेचे गुरुनाथ सावंत, महेश शेट्टी आणि रेणु सोनी आदी मान्यवर उपस्थित होते.