एचएसएनसी समूह विद्यापीठाने देशातील सर्वोत्तम ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ होण्याचा प्रयत्न करावा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

विद्यार्थ्यांनी संतुलित, सुविद्य, सुसंस्कृत व जातीविरहित भारत निर्माण करण्याचे ध्येय बाळगावे : डॉ रघुनाथ माशेलकर

मुंबई :- मोठ्या विद्यापीठांच्या तुलनेत लहान विद्यापीठांच्या माध्यमातून शैक्षणिक विकास व गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे अधिक सुलभ असल्यामुळे केंद्र शासन लहान विद्यापीठांच्या स्थापनेला प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे मुंबईतील तीन नामांकित महाविद्यालयांचा समावेश असलेल्या एचएसएनसी समूह विद्यापीठाने देशातील सर्वोत्तम ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ होण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. 

हैद्राबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट (एचएसएनसी) समूह राज्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारोह राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. ११) मुंबई येथील के. सी. महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. दीक्षांत समारोहाला ज्येष्ठ शास्त्रज्ञ तसेच जागतिक संशोधन परिषदेचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

एकेकाळी भारतातील नामांकित नालंदा, तक्षशिला आदी विद्यापीठांमध्ये जगभरातील विद्यार्थी शिकायला येत. यानंतर पुनश्च देशविदेशातील विद्यार्थी भारतात शिक्षण घेण्यासाठी आले पाहिजे असे नमूद करून विद्यार्थ्यांनी नवसंशोधन, उद्यमशीलता यांना उत्तम चारित्र्याची जोड देऊन देशाचे नाव उंचावण्यासाठी प्रयत्न करावे असे राज्यपालांनी सांगितले.

एकविसावे शतक भारताचे असेल व त्यात देखील ते अध्यात्माचे असेल या इतिहासकार अरनॉल्ड टॉयनबी यांच्या विधानाचा दाखला देत अध्यात्म ही भारताची खरी कुंजी आहे हे लक्षात घेऊन स्नातकांनी भारतीय जीवनमूल्ये जपावी असे राज्यपालांनी सांगितले. सर्व विद्यापीठांमधील सुवर्ण पदक विजेत्यांमध्ये अधिकांश महिला स्नातक असल्याबद्दल राज्यपालांनी समाधान व्यक्त केले.

आपल्या दीक्षांत भाषणात ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ रघुनाथ माशेलकर यांनी स्नातकांना संतुलित, सुसंस्कृत, सुविद्य, समृद्ध, सुशासित, सुरक्षित, स्वानंदी तसेच जातीविरहित भारताच्या निर्मितीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

राज्यपालांच्या हस्ते विविध विद्याशाखांमधील १५ गुणवत्ताप्राप्त स्नातकांना सुवर्ण पदक तसेच प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी एचएसएनसी विद्यापीठाचे प्रोव्होस्ट डॉ निरंजन हिरानंदानी, विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ हेमलता बागला, एचएसएनसी मंडळाचे अध्यक्ष अनिल हरीश, कुलसचिव भगवान बालानी, परीक्षा मंडळाचे संचालक एम एन जस्टीन, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक तसेच स्नातक उपस्थित होते.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वकील आणि भविष्यातील न्यायाधीशांनी आपल्या व्यावसायिक जीवनामध्ये संविधानात्मक मूल्यांचा अंगीकार करावा - भारताचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांचे आवाहन

Sat Feb 11 , 2023
– राष्ट्रीय विधि विद्यापीठ नागपूरचा पहिला दीक्षांत समारंभ संपन्न  नागपूर :-विधि शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या वकील आणि भविष्यातील न्यायाधीशांनी आपल्या व्यावसायिक जीवनामध्ये संविधानात्मक मूल्यांचा अंगीकार करावा त्यामुळे त्यांंना कधीच अपयश येणार नाही . कायदा आणि समाजाला , न्यायाच्या समांतर आणण्यासाठी वकील आणि न्यायाधीशांनी संविधानात्मक मुल्यासह पुढाकार घेणे आवश्यक आहे . समाजातील विषमता आणि जातीभेद यांच्यावर मात करून डॉ . बाबासाहेब […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com