संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्ध पातळीवर सुरू
नागपूर :- राज्य शासन भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. विदर्भासह राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून शासनाला अहवाल प्राप्त होताच तातडीने शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे राज्याच्या विविध भागात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासंदर्भात नुकत्याच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे निर्देश यंत्रणांना देण्यात आले. त्यानुसार राज्यात नुकसानीचे पंचनामे युद्ध पातळीवर सुरू आहेत.
२ हेक्टर ते ३ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे करण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. राज्यभरातून पिकांच्या प्राप्त नुकसानीचे अहवाल एकत्र आल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
खासदार कृपाल तुमाने, आमदार ॲड. आशिष जयस्वाल यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी आदींनी मुख्यमंत्री शिंदे यांचे विमानतळावर स्वागत केले.