– निलेश राणेविरोधात आंदोलन करणार्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक…
मुंबई :- धर्मनिरपेक्षता हा शरद पवार यांचा आत्मा आहे, शरद पवार यांना त्यांची धर्मनिरपेक्ष भूमिका बदलायला कोणीही भाग पाडू शकत नाही आणि अशा धमक्यांचा त्यांना अजिबात फरक पडत नाही असे स्पष्ट सांगतानाच आता सरकार धर्मनिरपेक्षतेला चालना देणार की, संविधान टिकवणार की, दाभोळकरांच्या मारेकऱ्यांना मोकळा हात देणार हे सरकारने स्पष्ट करावे असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.
शरद पवार यांना धमकीची बातमी व्हायरल होताच आमच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला फोन करून त्यांच्या सुरक्षेची विचारपूस सुरू केली. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना कोणत्याही परिस्थितीत शांतता राखण्याचे आवाहन केले आहेत असेही महेश तपासे म्हणाले.
निलेश राणे याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात बदनामीकारक ट्विट केल्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जेल भरो आंदोलन केले. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आझाद मैदानातून पोलीस व्हॅनमध्ये बसवून यलो गेट पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली.
आमचे कार्यकर्ते शरद पवार यांच्याबद्दल भावनिक असून त्यांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू, असेही महेश तपासे यांनी सांगितले.
निलेश राणे याच्याकडे कोणतीही नैतिकता नसल्याने ईडी सरकार त्याच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही, याची आम्हाला खात्री होती, त्यामुळेच निषेध म्हणून आम्ही जेल भरो आंदोलन करवून अटक केली असल्याचे महेश तपासे म्हणाले.
यावेळी मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, राखी जाधव यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांच्यासह सर्व जिल्हाध्यक्ष, युवक व महिला यांच्यातर्फे मुंबई ‘जेल भरो’ आंदोलन करण्यात आले. यामध्ये नसीम सिद्धीकी, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले, महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, ओबीसी कार्याध्यक्ष राज राजापूरकर, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे , अल्पसंख्याक मुंबई अध्यक्ष सोहेल सुभेदार, युवक उपाध्यक्ष अमोल मातेले, प्रशांत पाटील, आरती साळवी, भावना घाणेकर, प्रमोद पाटील यांच्यासह अनेकांना पोलिसांनी अटक केली.