जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदेवर अजून किती दिवस राहणार प्रशासक ? 

– २५ महिने उलटून गेले तरीही जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका नाही ! 

– निवडणुका लांबल्याने इच्छुक कार्यकर्त्यांची कोंडी ! 

दापोरी प्रतिनिधी :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २०२२ ते २०२७ च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होण्याच्या कार्यकाळाला आता २५ महिने उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या नाहीत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. अनेक इच्छुकांनी गेल्या २५ महिन्यापासून आपल्याला उमेदवारी मिळेल या हेतूने सर्व प्रकारची तयारी करून ठेवली आहे. मात्र, अद्यापही जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना सरकारच्या माध्यमातून काहीच निर्णय होत नसल्याने इच्छुकांच्या नजरा निवडणूक कधी जाहीर होणार याकडे लागल्या आहेत.

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवसेंदिवस लांबणीवर पडत असून, कार्यकत्यांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे. राज्यातील सत्तातरांचे खेळ पाहता नेमके कोणाशी निष्ठावान राहावे, कोणासोबत जावे, कोणत्या पक्षात काम करावे, हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला असून, कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

गुडघ्याला बांशिग बांधून निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या इच्छुकांची कोंडी झाली आहे. ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. परिणामी, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेवर प्रशासकांची नियुक्ती झाली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची तयारी प्रशासनाने केली होती.

कोरोनाची स्थिती सामान्य झाल्यानंतर नगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जारी केला होता. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद गटनिहाय आरक्षण, गट, गण रचना तसेच जिल्हा अध्यक्षपदाचे आरक्षण या सर्व बाबींची तयारी केली होती.

त्यामुळे अवघ्या काही दिवसांत निवडणुका लागण्याची शक्यता होती. मात्र, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेपर्यंत निवडणुका नको, अशी भूमिका सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी त्यावेळी घेतली.

यातच जून २०२२ मध्ये राज्यात सत्तांतर झाले. ओबीसी आरक्षण, पुन्हा नव्याने वॉर्ड रचना, प्रभाग पद्धतीत बदल, असे विविध सुधारणा शिंदे सरकारने पुढे आणल्या. नंतरही ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणे अपेक्षित होते है मात्र, अद्याप निवडणुकांबाबत अजूनही हालचाली दिसत नाही. यातच सत्तातंरात दोन पक्ष फुटले अन्‌ दोन गटांत विभागाले गेले. पक्ष फुटीचा परिणाम स्थानिक पातळीवरही झाला आहे. यामुळे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.

काही जण गटागटांत गेले असले, तरी अनेकांनी आपले पत्ते खुले केलेले नाहीत. आताच लोकसभा निवडून होऊन गेली तरी विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील का? त्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नेमके काय करावे, असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून उपस्थित होत आहे. या परिस्थितीमुळे गुडघ्याला बांशिग बांधून रणागंणात उतरण्यासाठी इच्छूक असलेल्यांची कोंडी झाली आहे.

प्रशासकराज लोकशाहीसाठी घातक ! 

गेल्या २५ महिन्यांपासून जिल्हा परिषद पंचायत समिती, नगर परिषद सदस्यांच्या कार्यकाळ संपल्याने नागरिकांना आता संबंधीत प्रशासन विभागाकडे जावे लागत आहे.

सर्वसामान्यांना अधिकारी वर्गांशी संपर्क साधतांना अडचणी निर्माण होतात. निवडणुका न लावता प्रशासकीय कारभाराचा इतक्या दीर्घ कालावधीत, प्रशासकीय कारभारामध्ये लोकप्रतिनिधींचा कोणताही सहभाग नाही. हा सर्व प्रकार लोकशाहीसाठी घातक असून राज्य सरकारने लवकरात लवकर निवडणुकीमध्ये येणारे अडथळे दूर करून निवडणुका घेणे गरजेचे आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूरच्या शेफ नीता अंजनकर यांचा 1000 किलो आंबील बनवण्याचा विक्रम

Mon Apr 29 , 2024
– शंखनाद न्यूज चॅनेलच्या वतीने विदर्भस्तरीय पाककला स्पर्धा नागपूर :- प्रसिद्ध शेफ नीता अंजनकर यांनी अतुलनीय कामगिरी बजावत 1000 किलो आंबील बनवून एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे. महाराष्ट्र टेलिकम्युनिकेशन नागपूर द्वारा संचालित शंखनाद न्यूज चॅनेलच्या वतीने विदर्भस्तरीय पाककला स्पर्धा घेण्यात आली. यात भरडधान्यापासून १००० किलो आंबील तयार करण्याचा हा विश्वविक्रम करण्यात आला. यावेळी एशिया बुक रेकॉर्डच्या ज्युरी मेंबर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com