– निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना टपाली मतदानाची सुविधा
– कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यावर भर
नागपूर :- जेष्ठ नागरिकांमध्ये ज्यांचे वय 85 वर्षापेक्षा अधिक आहे असे नागरिक व दिव्यांग मतदार यांच्यासह निवडणूक कर्तव्यानिमित्त नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचारी मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भारत निवडणूक आयोगाने कार्यपध्दती विहित करुन दिली आहे. या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणताही मतदार आपल्या हक्कापासून वंचित राहू नये यादृष्टीने 85 वर्षापेक्षा अधिक वय असलेले व दिव्यांग मतदारांना गृह मतदानाचा लाभ उपलब्ध करुन दिला जात असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.
नागपूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात निवडणूक प्रक्रिया काटेकोर पार पाडली जावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
गृह मतदानासाठी नमुना 12-ड तत्काळ उपलब्ध करुन देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. याचबरोबर दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना ही निवडणूक प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी यांची काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. 12-ड चे फार्म सर्व बीएलओ यांनी काळजीपूर्वक आपल्या भागातील पात्र मतदारांपर्यंत पोहचतील यासाठी अधिक दक्षता घेण्याचे त्यांनी सांगितले.
निवडणूक कामाच्या विविध जबाबदारीसाठी कर्तव्यावर असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा भारत निवडणूक आयोगाने दिली आहे. यासाठी नमुना 12 साठी ज्यांची मागणी आली त्यांची पडताळणी करुन त्यांना मतदान पत्रिका दिलेल्या कालमर्यादेत मिळतील यासाठी संबंधीत अधिकाऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे. ही संख्या अधिक असल्याने त्याबाबत योग्य तो समन्वय साधून मतपत्रिकांच्या आदानप्रदान बाबतची कार्यवाही दिलेल्या कार्यपध्दतीनुसारच करण्याचे त्यांनी निर्देश दिले. टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करु इच्छिणाऱ्या तसेच निवडणूक कर्तव्यासाठी प्रमाणपत्राद्वारे मतदान करु इच्छिणाऱ्या मतदान कर्मचाऱ्यांसाठी अनुक्रमे नमुना 12 व 12-अ हे एनआयसी मार्फत उपलब्ध करुन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. ही सर्व प्रक्रिया करतांना अडचण भासल्यास जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी त्या अडचणी निरसन करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
– कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यावर भर
जिल्ह्याच्या सर्व सीमांवर काटेकोरपणे तपासणी करण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यामध्ये अवैध दारूची तस्करी आणि बेनामी रोकडीचे वहन होणार नाही, यासाठी सर्व यंत्रणांनी खबरदारी घ्यावी, असे डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. निवडणूक कालावधीत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यात अंमलबजावणी यंत्रणेचा मोठा सहभाग असतो. या यंत्रणेशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात झाली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, जिल्हा पोलिस अधीक्षक ग्रामीण हर्ष पोद्दार, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, पोलिस उपायुक्त विशेष शाखा श्वेता खेडकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे, पोलीस, आयकर, परिवहन, रेल्वे, राज्य उत्पादन शुल्क, परिवहन, नागरी उड्डयन आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.