संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- मागील एक महिन्याच्या विश्रांती नंतर कामठी तालुक्यात काल पासून चांगलाच मुसळधार पाऊस बरसला.या मुसळधार पावसाने सर्वत्र थैमान घातले असून सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण होत खोल भागात चांगलेच पाणी साचले होते.तर काल मध्यरात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पाऊस व विजेच्या कडकडाडीने भीतीमय वातावरण निर्माण होत बहुतांश घरात पाणी शिरल्याने रात्रभर नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होतो तर पूर्ण रात्र ही घरात शिरलेले पाणी बाहेर फेकण्यात गेली.
सर्वत्र कामठी तालुक्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते.कामठी तालुक्यातील नाले तलाव पूर्णता भरून गेल्याने तुडूंबपूर्ण स्थिती होती.कामठी तालुक्यात काल एकाच दिवशी 361.2मी मी पाऊस पडला असून सरासरी 90.3मी मी पाऊस पडला.
त्यानुसार कामठी शहरात एकाच दिवशी 172.4मी मी पाऊस पडला तसेच कोराडी 62.4 मी मी,दिघोरी 74.6 मी मी,वडोदा 51.8 मो मो पाऊस पडला.तर या पावसात कामठी तालुक्यात पूरमय परिस्थिती निर्माण झाली असून कामठी -आजनी गावाचा संपर्क तुटला होता तर घोरपड गावात एक घर पडून नुकसान झाले तर कामठी शहरातील यादव नगर येथील नटवरलाल यादव यांच्या घरातील पशुधनचारा साहित्य वाहून गेल्याने चांगलेच नुकसान झाले .
परतीच्या या पावसाने थैमान घातल्याने हातातून पीके जाण्याची शक्यता निर्माण झाली .सोयाबीन,धान आदी पिकांना फटका बसू शकतो.