– लक्षणे आढळताच वैद्यकीय सल्ला घ्या : अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल
नागपूर :- नागपूर शहरामध्ये डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेची संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरामध्ये सद्यस्थितीत ९२ डेंग्यू बाधित रुग्णांची नोंद झाली आहे, अशी माहिती मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी बुधवारी (ता.३०) पत्रकार परिषदेत दिली आहे.
मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. मंजूषा मठपती, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख महेश धामेचा उपस्थित होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी शहरातील सद्यस्थितीतील डेंग्यू रुग्णांची आकडेवारी मांडली. शहरातील दहाही झोनमध्ये १७ ते २९ ऑगस्ट २०२३ या कालावधीमध्ये ९२ डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे. यातील सर्वाधिक २० रुग्ण लकडगंज झोन, १७ लक्ष्मीनगर, १३ धरमपेठ आणि ११ मंगळवारी झोनमध्ये आहेत. नोंद झालेल्या सर्व ९२ डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरी जाऊन हिवताप व हत्तीरोग विभागामार्फत व आशा वर्कर मार्फत जलद ताप सर्वेक्षण करण्यात आले. तसेच वैद्यकीय अधिकारी पथक यांनी संबंधित पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरी भेटी देण्यात आल्या. तसेच डेंग्यू संशयित रुग्णांचे सिरम सॅम्पल आरोग्य कर्मचाऱ्यांच्या एएनएम/जेएनएम/लॅब टेक्नीशियन च्या माध्यमातून घेण्यात आले व ते सिरम सॅम्पल स्व. प्रभाकरराव दटके सेंटिनल सेंटर येथे पाठवून डेंग्यूची शहनिशा करण्यात आली. तसेच हिवताप व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मार्फत एकूण १,१४,८४९ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. या घरांमध्ये डासोत्पत्ती स्थळांचा शोध घेण्यात आला व दुषित असलेले एकूण २८४३ कंटेनर्स नष्ट करण्यात आले व कायमस्वरुपी डासोत्पत्ती स्थळांमध्ये गप्पीमासे सोडण्यात आले. त्या भागामध्ये स्प्रेईंग व फॉगिंग ॲक्टिव्हिटीज करण्यात आले. तसेच डेंग्यू विषयी जनजागृती करण्यात आली. ३०० जणांना नोटीस देण्यात आले, असेही अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी सांगितले.
योग्य वेळी निदान आणि वेळीच उपचार घेतल्यास डेंग्यू लगेच बरा होउ शकतो. त्यामुळे नागरिकांनी डेंग्यू सदृश्य लक्षणे आढल्यास त्वरीत वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहनही अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी यावेळी केले. परिसरात किंवा घरी डेंग्यू रुग्ण आढळल्यास स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. कुठेही पाणी जमा राहणार नाही याची काळजी घ्यावी. आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस पाळावा. डेंग्यू सदृश्य लक्षणे आढळल्यास जवळच्या मनपा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाउन नि:शुल्क वैद्यकीय सल्ला घ्यावा. मनपाची आरोग्य चमू सर्वेक्षणासाठी घरी आल्यास त्यांना सहकार्य करावे, असेही आवाहन आंचल गोयल यांनी केले.