– रेल्वेत चोरी करण्यात सराईत गुन्हेगार अटकेत
नागपूर :-रेल्वेत चोरी करणार्या हरीयानातील सांसी टोळीच्या 6 सराईत लुटारूंना पकडण्यात लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले. या टोळीने नागपूर – मुंबई मार्गावर धावणार्या अनेक गाड्यात चोरी करून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
रेल्वेत मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि हरीयानातील टोळ्या चोरी करण्यात सक्रीय आहेत. यातील हरीयानातील सांसी टोळी मागील काही वर्षांपासून नागपूर – मुंबई मार्गावर प्रवाशांना विश्वासात घेवून मदतीच्या नावाखाली त्यांच्याकडील दागिन्यांसह रोख रक्कम लंपास करते. नोव्हेंबर 2022 मध्ये फिर्यादी अनिकेत निकम हे विदर्भ एक्सप्रेसने प्रवास करीत असताना त्यांच्याकडील पाच लाख रुपये किमतीचे दागिने याच टोळीने चोरले. दरम्यान लोहमार्ग पोलिस आणि गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करीत होते. काही गुन्ह्याच्या तपासासाठी पथक हरीयानातही जावून आले.
दरम्यान सांसी टोळीतील काही सदस्य नागपुरात आल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पोलिसांनी गुप्तहेर तसेच तांत्रिक तपास करून त्यांचे लोकेशन मिळविले. आरोपी संत्रा मार्केट परिसरात असल्याची खात्री लायक माहिती होती. पथकाने सापळा रचून सहा आरोपींच्या मुसक्या आवळल्या. टोळीतील सदस्य पुन्हा चोरी करण्याच्या तयारीत होेते. त्यांच्याकडून एक लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक वैशाली शिंदे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास कानपिल्लेवार यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, सुरेश राचलवार, महेंद्र मानकर, नामदेव सहारे, रवींद्र सावजी, रविकांत इंगळे, राजेश पाली, चंद्रशेखर मदनकर, रोशन अली, प्रशांत उजवणे, चंद्रशेखर येडेकर, विनोद खोब्रागडे, अविन गजवे, नितीन शेंडे, अमित त्रिवेदी, मंगेश तितरमारे यांनी केली.
@ फाईल फोटो