ग्रामायण सेवा प्रदर्शन 2023 चे थाटात उद्घाटन

नागपूर :- ग्रामायण प्रतिष्ठानच्या वतीने तसेच नागपूर महानगरपालिका आणि पश्चिम नागपूर नागरिक संघ यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित पाचवे विदर्भातील वैशिष्टपूर्ण ग्रामायण सेवा प्रदर्शन 2023 चे उद्घाटन आज थाटात पार पडले.

येत्या 22 ते 26 डिसेंबर या काळात रामनगर मैदान रामनगर येथे आयोजित असलेल्या या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर महानगर संघचालक राजेश लोया आणि वर्धा येथील सुप्रसिद्ध सर्वोदय कार्यकर्त्या श्रीमती डॉ. विभा गुप्ता (अध्यक्ष – मगन संग्रहालय समिती, वर्धा संस्थापक आणि संचालक ग्रामोपयोगी विज्ञान केंद्र, वर्धा), रामायण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल सांबरे, सचिव संजय सराफ, पश्चिम नागपूर नागरिक मंडळाचे रवी वाघमारे उपस्थित होते.

सुविधांचा अभाव तरीही चांगल्या कलाकृती तयार करण्यास सक्षम

याप्रसंगी प्रमुख अतिथी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर महानगर संघचालक राजेश लोया म्हणाले, “ग्रामीण भागातील लोकांना सुविधांचा अभाव असला तरीही ते चांगल्या कलाकृती तयार करण्यास सक्षम आहेत. स्वदेशीची भावना निर्माण झाल्यास त्या वस्तू खरेदी होऊन समाजापर्यंत पोहोचतील, अशी अपेक्षा आहे. ग्रामीण भागातील या वस्तूंची स्तुती करून त्यांचे कौशल्य आणि कलाकृतीची दाद दिली पाहिजे. पर्यावरण, आरोग्य आणि सामाजिक सेवा या क्षेत्रातही ग्रामीण भाग पुढे जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ग्रामीण भागात कलेतून रोजगार निर्मितीसाठी कौशल्य शिक्षणाची गरज

वर्धा येथील सुप्रसिद्ध सर्वोदय कार्यकर्त्या डॉ. विभा गुप्ता यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, “बांबूच्या राखेतून अनेकांना रोजगार मिळाला आहे. त्यामुळे महिला आत्मनिर्भर होत आहेत. कारागिरांना रोजगार शिक्षण आवश्यक आहे. तंत्रज्ञान, अवजार आणि साहित्य उपलब्ध झाल्यास ग्रामीण भागातून कलेतून रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल.”

कार्यक्रमाचे संचालन नरेंद्र गिरीधर यांनी केले, तर आभार राजेंद्र काळे यांनी मानले. उद्घाटन प्रसंगी सरस्वती वंदन पंकज रंगारी यांनी सादर केले तर उद्घाटन सोहळ्याच्या समारोपिय कार्यक्रम प्रसंगी श्रावणी बुजोने हिने ग्रामायण गीत सादर केले.

या प्रदर्शनामध्ये बांबूपासून निर्मित साहित्य, लोणचे, पापड, नाचणीचे पदार्थ, स्वेटर, बॅग, मातीची भांडी, ज्वेलरी, हर्बल पेस्ट, गुड, ड्रायफूड, मसाला पावडर, खादीचे कपडे, महिलांचे साहित्य, घरगुती वापराच्या वस्तू, आयुर्वेदिक वनस्पती, औषधी, आयुर्वेदिक मेडिसिन प्लांट आदींचे स्टॉल लागलेले आहेत.

या प्रदर्शनाच्या माध्यमातून विदर्भातील ग्रामीण भागातील विविध प्रकारच्या पारंपारिक वस्तू आणि साहित्याची ओळख शहरी नागरिकांना होईल आणि त्यांचे संरक्षण आणि संवर्धन होण्यास मदत होईल. प्रदर्शनात ग्रामीण संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या कलाकारांची कलाकृती पाहायला मिळत आहे. या प्रदर्शनातून ग्रामीण संस्कृतीचे जतन होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

उद्घाटन सोहळ्यानंतर सेवा संस्था आणि समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्यासाठी संवाद सत्र झाले. तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय, सहयोग क्लस्टर, नागपूर यांच्या संयुक्त सहकार्याने हे संवाद सत्र पार पडले.या संवाद सत्रात सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सेवा संस्था आणि समाजकार्य महाविद्यालये यांच्यातील सहकार्य कसे वाढवता येईल, यावर चर्चा झाली. यात विविध महाविद्यालयाचे प्राचार्य विद्यार्थी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.

वेणुशिल्पी स्व. सुनील देशपांडे विश्वकर्मा कलाकार / कारागीर दालनाचा शुभारंभ

ग्रामायण सेवा प्रदर्शन २०२३ मध्ये उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वेणुशिल्पी स्व. सुनील देशपांडे विश्वकर्मा कलाकार / कारागीर दालनाचे फित कापून शुभारंभ करण्यात आला. या दालनामध्ये बांबू, लाकूड, कापड, काच, धातू इत्यादी विविध साहित्यातून तयार केलेली विविध प्रकारची कलाकृती आणि हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन करण्यात आले होते. या दालनात टाकाऊपासून बनवलेल्या वस्तू देखील पाहायला मिळाल्या. त्यात काचेच्या बाटल्यावर नक्षीकाम, कागद, धातूचे तुकडे इत्यादी टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या खेळणी, दागिने, सजावटीच्या वस्तू इत्यादींचा समावेश होता. या वस्तूंची रचना देखील अत्यंत सर्जनशील आणि आकर्षक आहेत. टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून या कलाकारांनी नवा अर्थ निर्माण केला आहे.

शनिवारी उद्योजक कारागीर कार्यशाळा

उद्योजक कारागीर यांच्याकरता एमएसईच्या सहकार्याने दिवसभराच्या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. MSME तज्ञांसोबत प्रदर्शनकर्ता, उद्योजकांकरीता ग्रामायण सेवा प्रदर्शनातून, सहभागी झालेल्या प्रदर्शक तसेच छोट्या व नविन उद्योजकांना संधी प्रदान करण्याच्या उद्देशाने, लोकांना व्यवसाय सुरु करुन त्याचे योग्य संचालन व यशस्वी वाटचाल करण्यास दिशा मिळू शकेल. या दृष्टीकोनातून सोबत कार्यशाळेचे आयोजन एसएमएच्या सहकार्याने केलेले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विदर्भाच्‍या विकासावर आमदार अडबाले यांनी वेधले लक्ष

Sat Dec 23 , 2023
– हिवाळी अधिवेशनात विविध प्रश्नांवर आमदार अडबाले यांनी केली चर्चा नागपूर :- नागपूर हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना आमदार सुधाकर अडबाले यांनी विदर्भातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. वन्यप्राण्यांचा धोका, दुष्काळी परिस्थिती, उद्योगामुळे होत असलेले प्रदूषण, बेरोजगारी आणि सैनिकी शाळेमध्ये विदर्भातील विद्यार्थ्यांना आरक्षण देण्याची मागणी यावेळी त्यांनी सभागृहात केली.https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 आमदार अडबाले म्हणाले की, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये वन्यप्राण्यांचा धोका मोठ्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com