– नव्या व्यवसायातील यशासाठी कार्यशाळेतून दिल्या टिप्स
– ग्रामायण सेवा प्रदर्शनात एमएसएमईतर्फे उद्योजक कारागीर कार्यशाळा
नागपूर :- ग्रामीण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ग्रामायण सेवा प्रदर्शनात एमएसएमई-विकास आणि सुविधा कार्यालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 23 डिसेंबर रोजी उद्योजक कारागीर कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेमुळे छोट्या व नविन उद्योजकांना त्यांच्या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली माहिती देत अनेक टिप्स दिल्या.
कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून युनिव्हर्स एक्स्पोर्टचे प्रवीण वानखेडे, एमएसएमईचे सहायक संचालक राहुल मिश्रा आणि श्रीकांत नागमोते उपस्थित होते.
या कार्यशाळेत एमएसएमई तज्ञांसोबत प्रदर्शनकर्ता, ग्रामायण सेवा प्रदर्शनात सहभागी झालेल्या प्रदर्शक तसेच छोट्या व नविन उद्योजकांना संधी प्रदान करण्याच्या उद्देशाने, लोकांना व्यवसाय सुरु करुन त्याचे योग्य संचालन व यशस्वी वाटचाल करण्यास दिशा मिळाली.
कार्यशाळेत एमएसएमईसाठी सरकारी योजना आणि उपक्रम, एमएसएमईची क्षमता वाढवणे, निर्यात दस्तऐवजीकरण आणि कृषी उत्पादनांच्या निर्यातीसाठी प्रक्रिया, बँक कर्ज आणि प्रक्रिया, या विषयांवर चर्चा झाली. उत्पादनांच्या पॅकेजिंगवर तज्ञांचे सत्र पार पडले.
नियोजन आणि काळजीपूर्वक प्रक्रिया आवश्यक
यावेळी प्रवीण वानखेडे यांनी सध्याच्या बाजारपेठेतील वातावरण आणि त्यातून यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, निर्यात करण्यासाठी कोणत्याही विशेष कौशल्याची आवश्यकता नाही. कोणतीही वस्तू निर्यात केली जाऊ शकते. मात्र, त्यासाठी योग्य नियोजन आणि काळजीपूर्वक प्रक्रिया आवश्यक आहे. श्री वानखेडे यांनी स्वतःच्या जीवनाचा प्रवास अगदी एका भूमिपुत्रापासून तर एक्सपोर्टरपर्यंतची मजल उलगडून सांगितले.
सरकारी योजनांची माहिती
एमएसएमईचे सहायक संचालक राहुल मिश्रा यांनी विविध सरकारी योजनांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, एमएसएमई लहान उद्योजकांना विविध प्रकारे मदत करते. प्रोडक्टचे ब्रँडिंग, ट्रेडमार्क, बारकोडिंग आणि पॅकेजिंग डेव्हलोप करण्यासाठी एमएसएमई मदत करते. तसेच, लहान उद्योजकांसाठी रिटेल आउटलेट उघडण्यासाठी देखीलएमएसएमई मदत करते.
इको फ्रेंडली पैकेजिंगचे महत्त्व
श्रीकांत नागमोते यांनी प्रोडक्टच्या पॅकिंग खास करुन इको फ्रेंडली पैकेजिंगचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी सांगितले की, आजच्या ग्राहकांना आकर्षक आणि पर्यावरणास अनुकूल पॅकेजिंगची मागणी आहे. त्यानुसार पॅकेजिंग केल्यास ग्राहकांचे लक्ष वेधून घेणे सोपे जाते.
दरम्यान संजय सराफ यांनी राहुल मिश्रा, रमेश लालवानी यांनी प्रवीण वानखेडे, तर मिलिंद गिरीपुंजे यांनी श्रीकांत नागमोते यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन अस्मिता बुजोणे हिने केले. कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या उद्योजकांनी या कार्यशाळेचे कौतुक केले.