नागपूर :- शासकीय वसतिगृहासाठी पात्र असतानाही संख्येअभावी प्रवेश न मिळू शकणाऱ्या विद्यार्थ्यांना रुमभाडे व भत्ता देणाऱ्या लोकप्रिय भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत नागपूर जिल्ह्याने विक्रमी 7 हजारावर विद्यार्थ्यांना लाभ दिला आहे. यासाठी शासनाकडून 25 कोटी निधी मिळाला असून शासन आपल्या दारी अभियानात याचे वितरण सुरु झाले आहे.साहाय्यक समाज कल्याण आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार सन 2021-22 व 2022-23 मधील एकूण 7 हजार 649 विद्यार्थ्यांसाठी “शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत शासनाकडून 25 कोटी 80 लाख 92 हजार 700 निधी मिळाला असून विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यावर थेट जमा होणार आहे.
शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय व प्रवेश, शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधा अभावी पुढील शिक्षण घेवू शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्याथ्यांपैकी इयत्ता अकरावी, बारावीच्या व्यवसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरांवरील महाविद्यालयात शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वतः त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा करण्याचा निर्णय शासनाने केलेला आहे.यानूसार विद्यार्थ्यांना भोजन भत्ता32 हजार, निवास भत्ता 20 हजार, निर्वाह भत्ता 8 हजार अशी प्रती विद्यार्थी संभाव्य एकूण देय रक्कम 60 हजार मिळणार आहे.
या योजनेसाठी विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द या प्रवर्गाचा असावा. विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक असावा. त्याने ज्या राष्ट्रीयकृत व शेडयुल्ड बँकेत खाते उघडले असावे. त्या विद्यार्थ्याच्या पालकांचे उत्पन्न 2.50 लाख पेक्षा जास्त नसावे, अशा अटी शर्ती आहेत. तसेच विद्यार्थी इयत्ता 11 वी 12वी आणि त्यानंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा. अकरावी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास दहावी मध्ये किमान 50 टक्के गुण असणे अनिवार्य आहे. दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची टक्केवारी 40 टक्के इतकी राहील व त्यासाठी त्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शासनाच्या शासन आपल्या दारी अभियानात जिल्ह्यातील 7 हजार 649 विद्यार्थ्यांना हा लाभ मिळत असल्याने विभागाने समाधान व्यक्त केले आहे.