उपराजधानीत नावाजलेले मोजके डॉक्टर. त्यापैकी एक डॉ.सुहास कानफाडे. चेहऱ्यावर सदैव स्मित हास्य. ती मित्रांची मैफिल असो की हॉस्पिटल सेवा. या हास्याचे सर्वाधिक लाभार्थी रूग्ण. ते कंण्हत येतात. डॉक्टरसोबत गाठ पडते. ते विचारपूसीतच सुखावतात. हंसत बोलणं. सोबत हलक्या-फुलक्या विनोदाच्या सरीं. त्या संवादात रूग्णांचे कंण्हणं थांबतं. चेहऱ्यावरच्या वेदना क्षणात भूर्र …! थोडं हास्य खुलते. तिथे डॉक्टर-रूग्ण नातं घट्ट होतं. डॉक्टरातील आपुलकी जाणवते. तब्बेतीला आराम मिळेल. हा विश्वास बळावतो. तो डॉक्टर सोबत खुलून बोलतो. मन हलकं करतं. आजाराचं दडपण जातं. तो उपचाराला उत्स्फुर्त प्रतिसाद देतो. हे अनुभव रोजच येतात. ते सहकारी अनुभवतात. या स्वभावानेच माणसं जुळली. जे सहकारी जुळले ते आजही कायम आहेत. त्यात काेणी मावशी बनल्या. कोणी दादा. त्या सर्वांना हॉस्पिटल आपलं वाटू लागलं. यातून सहकार्यींची समर्पित भावना वाढली. त्यानं हॉस्पिटलची प्रगतीकडे वाटचाल सूरू झाली. लोकांचा विश्वास संपादन केला. आता ह्रदयविकाराची थोडी जरी शंका आली.तरी लोकांना कानफाडे हॉस्पिटल आठवतो. त्यामागे विश्वसनिय रूग्ण शृश्रृषा !
सुहास हे वेगळेच रसायन. नातं व मैत्री जपणारं व्यक्तिमत्व. सामान्य कुटुंबातून आलेले. विद्यार्थी दशेत विद्यार्थी चळवळीत सक्रिय. आरोग्य शिबिरांत आवर्जून हजेरी. पदव्यूत्तर वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. कुटुंबाची आर्थिक गरज म्हणून सरकारी नोकरी पत्करली. तिथे बदल्यांचा ससेमिरा. शिक्षणातील स्पेशिलायजेशन उपयेगात अनेक मर्यादा. शेवटी निर्णय घेतला. वेतनातून थोडी जमापूंजी जमली. मदतीला बँकेतून कर्ज काढले. तेव्हा बॅंका सहज कर्ज देत. त्या कर्जातून 1992 मध्य वडिलाच्या स्मृर्तित हॉस्पिटल उभारलं. ते रामदासपेठेतील नावलौकीकास आलेले ” गणेशराव कानफाडे मेमोरियल हॉस्पिटल अँड फिजिओथेरापी सेंटर ” या हिंमतीला दाद दिली पाहिजे. मेडिकलमध्ये त्यांना शिकविणाऱ्या अनेकांना हे धाडस करता आलं नाही. ते धाडस सुहास यांनी केलं. त्यानं अनेकांची हक्कानं बसण्याची सोय झाली. या सोयीने वरिष्ठही सुखावले. त्यांच्या दीर्घ अनुभवाचा लाभही मिळत राहिला. हा भाग वेगळा. सुहास अनेकांसाठी प्रेरणा ठरलेत. ओळखीतील अनेकांनी हे धाडस केलं. त्यातून मित्रांचेही छोटे-मोटे हॉस्पिटल नागपुरभरात उभी झालीत.
सुहासची भेट विद्यार्थी दशेतील. तेव्हा मेडिकल हॉस्टेलला ये-जा होती. विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत ती घट्ट झाली. शशिभूषण वाहाणे लॉ कॉलेजचे विद्यापीठ प्रतिनिधी होते. तेव्हा सुहास आणि शशि यांची घट्ट मैत्री होती. ती आमच्या पर्यंत झिरपली. तेव्हापासून ती कायम आहे. मैत्री जपणारे सुहास सह्रदयी आहेत. हा संपर्कातील सर्वांचा अनुभव .सुहासबाबत अभिमान वाटावा. त्यांची अनेक कारणे आहेत. त्याच्यात प्रेम व कनवाळूपणा ठासून भरलेला. आखिव चेहरा. अभिताभ बच्चनच्या तोडीची उंची. त्यामुळे मेडिकलचा अभिताभ ही वेगळी ओळख. उंचीप्रमाणे मनाचं मोठेपण. व्हिआयपी असो की सामान्य सारखीच वागणूक. सर्वांसोबत मिळून मिसळून राहण्याची सवय. डॉ. सुहास यांनी आतापर्यंत हजारों ह्रदयविकारांचे रूग्ण बरे केले. त्यापेक्षा किती तरी अधिक लोकांना प्राथमिक लक्षणातूनच सावरले. केवळ उपचारच नाही. तर सोबतीला समुपदेशनची हमखास डोज देतो. त्याचा रूग्णांना आयुष्यभर लाभ मिळतो.असे डॉक्टर मोजके. वडिल ह्रदयविकाराने दगावले. हे शल्य आहे. त्यातून हा विकार जडू नये. जडला तर प्रारंभीच आटोक्यात आणा. ही धडपड असते. त्यासाठी अवगत औषधी कौशल्य पणाला लावतो. त्यातून सदृढ आयुष्य जगण्यास हातभार लावतो. विद्यार्थी दशेत पितृछत्र हरपले. ते दु:ख पचवावे लागले. त्यातून उच्च अभ्यासक्रमात या शाखेची निवड केली. जिद्दीने तो अभ्यासक्रम पूर्ण केला. हॉस्पिटल थाटलं. यातून पैशा कमी.त्यापेक्षा पत जास्त कमावली. ती लाखमोलाची आहे.
देशात आणीबाणी होती. तेव्हा नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. वैद्यकीय शिक्षण चालू होते.इकडे एमबीबीएस अंतिमची परीक्षा दहा दिवसावर होती. अन् तिकडे वडिल 5 डिसेंबर 1979 रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने दगावले. कुटुंबातील सर्वाधिक प्रिय व कमावती व्यक्ती गमावल्याचं दु:ख मोठं असतं. तेव्हा मुलांच्या मनस्थितीची कल्पना करवित नाही. त्यातून ते कसे तरी सावरले. परीक्षेला सामोरा गेले. चांगल्या गुणांनी परीक्षा पास केली. त्या जोरावर उच्च शिक्षणात प्रवेश मिळाला. पुढील शिक्षणात आर्थिक झळ सोसावी लागली. मात्र हिंमत सोडली नाही. एमडीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. रामदासपेठ वैद्यकिय हब . तिथे हॉस्पिटल हे अनेकांचे स्वप्न असते. ते स्वप्न व्यक्तिगत हिंमतीवर साकारले. त्यात थोरल्या भावाची साथ उल्लेखनिय आहे. कानफाडे कुटुंब सामाजिक जाण व भान असलेला. हा वारसा काल होता. तो आजही तसाच आहे. लहान भाऊ डॉ. प्रविण. औरंगाबादच्या मेडिकल कॉलेजात होते. तेव्हा बनावट पेनिसिलीन इंजेकशनची चर्चा होती. ते उघडकीस आणण्याची जोखीम घेतली होती. अधिष्ठात्याची वृतपत्रांत वरपर्यंत मैत्री होती. त्यातून बातमीत आडकाठीची भीती होती. औरंगाबाद लोकमतचे सर्वस्व राजेंद्र दर्डा होते. त्यांची मदत घ्यावी लागली. वरिष्ठांना न सांगता बातमीचा पाठलाग सुरू झाला. तत्कालिन मुख्य वार्ताहराचा संपर्क दांडगा होता. त्याला आमच्या बातमीची धडपड कळली. त्यानं सरळ अधिष्ठात्यांनाच विचारलं. अधिष्ठात्यांनी लगेच लोकमत गाठलं. बातमी स्फोटा अगोदर. संबंधांचा स्फोट झाला. राजेंद्रबाबू यांच्या रूग्ण म्हणून दाखल होण्याच्या कल्पनेला सुरूंग लागलं. . अखेर बातमी सत्य असेल तर रिस्क घ्या अन् बातमी द्या. असा निर्णय झाला. ती बातमी आली. लगेच बाजारातून इंजेक्शन गायब झाले. अनेक रूग्णांचे भले झाले. मात्र अधिष्ठाता डॉ.प्रविण व डॉ.तायडेंवर कोपले. लोकमतमुळे कोप निष्भ्रम झाला. यावर कधी तरी विस्तारानं लिहिता येईल. या घटनेचा उल्लेख एवढ्यासाठी कानफाडे कुटुंब सामाजिक जाण कशी बाळगतो. ते दाखविण्यासाठी. बरं ते जाऊ द्या. आजचा दिवस आनंदाचा. जन्मदिनाचा असल्याने आनंदावर बोलू. सुहासचा उजळ वर्ण, भावपुर्ण डोळे, समृध्द उंची. छाप पाडणारे व्यक्तिमत्त्व. डोक्यावर क्विंचित कुरळे पण घनदाट केस. गळ्यात स्टेटस्कोप. वेगवान चाल. डोळ्यात आपुलकीचे भाव .अन् वागण्यात सहजता .अशा अनेक गुण वैशिष्ट्यांचा धनी. विमान असो की गर्दी हमखास उठून दिसणारे व्यक्तिमत्त्व. तेवढ्याच सामाजिक जाणिवा ठासून भरलेल्या. त्यावर बिनधास्त व्यक्त होणारे डॉ. सुहास. त्यांचा 22 ऑक्टोंबर-1958 जन्म दिन. आज 65 व्या वर्षात पदार्पण. यानिमित्त या डॉक्टरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
– भूपेंद्र गणवीर