मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सर्वांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे – केंद्रीय निवडणूक निरीक्षक परवीनकुमार थिंड

मुंबई उपनगर :- मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. सर्वांचे लक्ष मुंबईकडे असते. लोकसभेची निवडणूक मुक्त व निर्भय होण्यासाठी प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून राज्यातील यंत्रणा सज्ज झाली आहे. यामध्ये वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांपासून ते मतदारदूतांपर्यंत सर्वांचीच भूमिका महत्वाची असणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी आपण सर्वांनी मतदानाच्या या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय निवडणूक निरीक्षक परवीनकुमार थिंड यांनी केले.

वांद्रे (पश्चिम) येथील आर. डी. नॅशनल कॉलेज येथे गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या सभासदांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीत मुंबई उपनगर जिल्ह्यातील किमान 70 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर आणि अपर जिल्हाधिकारी तथा ‘स्वीप’ चे मुख्य नोडल अधिकारी किरण महाजन यांच्या समन्वयाने जिल्ह्यात मतदारांमध्ये जनजागृती होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सहकारी संस्था सभासदांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी अपर जिल्हाधिकारी तथा ‘स्वीप’चे मुख्य समन्वयक डॉ. महाजन, स्वीपचे नोडल अधिकारी डॉ. सुभाष दळवी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (2) पूर्व उपनगरचे दहिभाते, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (3) पश्चिम उपनगरचे वीर, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (4), मुंबई, स्वीपच्या आयकॉन ॲड. अश्विनी बोरुडे, डॉ. मृण्मयी भजक, मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष, सचिव आणि पदाधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय निवडणूक निरीक्षक थिंड म्हणाले की, मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्ह्यात स्वीपच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येत आहे. या उपक्रमांदरम्यान मतदानासंबंधित काही समस्या असतील, तर संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सोडविण्यात येतील. त्यामुळे आपण सर्वांनी मतदान प्रक्रियेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेवून भावी पिढीसमोर एक आदर्श ठेवावा, असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी क्षीरसागर म्हणाले की, मुंबई उपनगर जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार गृहनिर्माण संस्था आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात सुमारे 73 लाख लोकसंख्या असून या गृहनिर्माण संस्थांमध्ये सुमारे 20 लाख मतदार आहेत. मतदानाच्या प्रक्रियेत 50 टक्के मोलाचा वाटा हा या गृहनिर्माण संस्थांचा आहे. निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष तसेच सचिवांना मतदान केंद्रावरील मतदार दूत म्हणून काही विशेष अधिकार दिले आहेत. आपण आपल्या संस्थामधील एकूण किती कुटुंब आहेत, त्यामध्ये किती नागरिकांचे मतदान आहे, याची एक यादी तयार करावी. त्यांनतर त्यांना 20 मे 2024 रोजी मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे.

देशाच्या स्वातंत्र्यापासून राज्यघटनेने आपल्याला मतदानाचा अमूल्य अधिकार दिला आहे. माझा देश कोणी चालवावा हे ठरविण्याचा अधिकार मला आहे. आणि त्यासाठी आपण सर्वांनी मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे. यंदाच्या लोकसभा निवडणूकीत मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी 70 टक्क्यापर्यंत नेण्याचे उद्दिष्ट निश्चित आहे. यावेळी सहकारी गृहनिर्माण संस्थांनी शंभर टक्के मतदान केले, तर त्या संस्थांचा राष्ट्रीय मतदार दिनी विशेष सन्मान करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले.

डॉ. महाजन म्हणाले की, मुंबईमध्ये येत्या 20 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात सहकारी संस्थांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या संस्थांमध्ये हजा़रोंच्या संख्येने मतदार रहिवासी आहेत. या मतदारांना आपल्या मतदार संघातील मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यासाठी सहकारी संस्थांचे अध्यक्ष, सचिव, किंवा सभासदांनी मार्गदर्शन करावे, महिला आणि नवमतदार यांना मतदान कसे करावे याबाबत मार्गदर्शन करावे. त्यासाठी गृहनिर्माण संस्थांनी व्हॉट्सअपचा गृप तयार करावा. जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी राष्ट्रीय कार्य म्हणून सर्वांनी या प्रक्रियेत उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहनही श्री. महाजन यांनी यावेळी केले. स्वीपचे नोडल अधिकारी डॉ. दळवी म्हणाले की, गृहनिर्माण संस्थांमधील मतदारांनी अधिकाधिक मतदान करून नवा आदर्श निर्माण करावा. जिल्हा उपनिबंधक दहिभाते यांनी मार्गदर्शन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारताची सार्वत्रिक निवडणूक पाहण्यासाठी आतापर्यंतचे सर्वात मोठे जागतिक प्रतिनिधी मंडळ

Mon May 6 , 2024
– भारतीय निवडणूक स्थळ, प्रक्रिया आणि त्यातून निर्माण होणाऱ्या क्षमतेचे योगदान जगासाठी प्रचंड ‘लोकशाही अधिशेष’ निर्माण करते: मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार – प्रत्येक वेळी निवडणुकीनंतर निकालांवर लोकांचा विश्वास हा भारतातील मजबूत लोकशाही प्रक्रियेची साक्ष देतो    नवी दिल्ली :- पारदर्शकतेची संस्कृती जोपासण्यासाठी आणि लोकशाही राष्ट्रांमधील उच्च दर्जाच्या निवडणूक प्रक्रियेच्या बांधिलकीचा पुनरुच्चार करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या (ईसीआय) परंपरेनुसार, 23 देशांचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com