अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया – गुन्ह्यांवर प्रतिबंध घालणे व त्यानंतरचे काम म्हणजे घडलेल्या गुन्हयांचा तपास करून आरोपी विरुध्द योग्य व सबळ पुराव्यासह न्यायालयात दोषारोपपत्र सादर करणे. हे पोलिसांचे महत्वाचे काम असते. त्या कामात अनेक अडचणी येतात त्यावर उपाय म्हणून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांच्या संकल्पनेतून गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिंकाच्या सुविधेसाठी ‘पोलीस आपल्या दारी’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. तर हे उपक्रम राज्यातील पहिले उपक्रम असल्याचे बोलले जात आहे.
या उपक्रमातून गुन्ह्यांची उकल व तपास अधिक गतीने होणार आहे. एखाद्या व्यक्तीच्या विरोधात तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात जावे लागत होते. परंतु आता गोंदिया पोलिसांनी ‘पोलीस आपल्या दारी’ हा नाविन्य उपक्रम सुरू केला आहे. त्यानुसार गंभीर गुन्ह्यांची एफ आय आर पीडितेच्या घरी किंवा घटनास्थळा तसेच रुग्णालयात जाऊन पोलीस करणार आहेत,अशी माहिती पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांनी दिली. जनतेच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याबरोबरच त्यांना लोकाभिमुख सेवा देणे, पोलिसांच्या कामकाजात गतिमानता आणणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे.