Ø जागतिक छायाचित्रण दिन साजरा
नागपूर :- ब्लॅक ॲण्ड व्हाईट ते कृत्रिम बुद्धीमत्ता असा प्रवास करणारी छायाचित्रण कला आपल्या एका छायाचित्रातून हजारो शब्दांतील भावना व्यक्त करते. वृत्त सृष्टीतील वृत्तछायाचित्रण कलेला वाव देण्यासाठी व त्यातून व्यावसायीक अर्थाजन होण्यासाठी शहरात नियमितपणे छायाचित्र प्रदर्शन आयोजित करावे, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी हमी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज दिली.
नागपूर प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशन व माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज होटेल सेंटर पॉइंट येथे जागतिक छायाचित्रण दिन साजरा करण्यात आला. आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजीत वंजारी, संदीप जोशी, राजाभाऊ टाकसाळे, अंगदसिंग अरोरा मंचावर उपस्थित होते.
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त छायाचित्रणक्षेत्रात उल्लेखणीय कामगिरीबद्दल ज्येष्ठ संपादक व छायाचित्रकार व्ही.एल. देशपांडे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभागाचे विभागप्रमुख व छायाचित्रकार डॉ. मोईज मन्नान हक, यांना मान्यवरांच्या हस्ते स्व. उदयराव वैतागे स्मृती सन्मान व पुरस्कार वितरीत करण्यात आला.
राजेश टिकले यांनी प्रास्ताविकेतून कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती देतांना वृत्तछायाचित्रण क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांचे कौतुक व्हावे यासाठी दरवर्षी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत मुळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार मुकेश कुकडे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाला नागपूर प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष संदीप गुरघाटे, सचिव विक्की वैतागे तसेच इतर पदाधिकारी सर्वश्री संजय लाचुरिया, राकेश वाटेकर, अजय वैतागे, मुकेश कुकडे, विशाल महाकाळकर, प्रतिक बारसागडे, विजय जामगडे, कुणाल जयस्वाल, रोशन सिंग, विरेंद्र तेलंग व वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत वृत्तछायाचित्रकार उपस्थित होते.