मुंबई :- पती गमाविलेल्या महिलांना त्यांचा आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी राज्यातील अनेक गावांमध्ये प्रयत्न सुरू असताना, सरकार ‘गंगा भागिरथी’ हा जो काही वेगळा विचार करीत आहे, तो घाईघाईने घेतलेला निर्णय वाटतो त्यामुळे तो तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करुन केली आहे.
महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधवा महिलांसाठी घेतलेल्या निर्णयावर खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्षेप घेतला असून तसे ट्वीट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यातील विधवा महिलांसाठी ‘गंगा भागिरथी’ असा शब्दप्रयोग करण्याबाबत सरकार विचार करीत आहे मात्र हे अतिशय वेदनादायी आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी व क्रांतीज्योती सावित्रीमाई अशा कर्तुत्ववान महिलांनी महाराष्ट्राची जडणघडण केली आहे. फुले-शाहू-आंबेडकर-साने-कर्वे यांच्या प्रागतिक विचारांचा महाराष्ट्र आहे याची आठवणही खासदार सुप्रिया सुळे यांनी करुन दिली आहे.
महिलांच्या बाबतीतील हा अतिशय संवेदनशील विषय हाताळत असताना व त्यासंबंधी मोठा निर्णय घेत असताना त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था व संघटनांना विश्वासात घेऊन व त्यांच्यासोबत विचार विनिमय करून मंत्री मंगलप्रभात लोढा आपण निर्णय घेतला पाहिजे अशी सूचनाही खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.