विधानसभा निवडणुकीसाठी नागपूर सीमेलगत मध्य प्रदेशातील जिल्ह्यांचे पूर्ण सहकार्य

Ø नागपूर व मध्य प्रदेश सीमेलगत जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक

नागपूर :- आगामी विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी नागपूर जिल्ह्याच्या सीमेलगत मध्यप्रदेशमधील जिल्ह्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल व समन्वय राखण्यात येईल,असा विश्वास आज वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार नागपूर जिल्ह्यातील नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील मध्य प्रदेशाच्या सीमा लगत जिल्ह्यांशी समन्वयाद्वारे विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदान पार पाडण्याच्या उद्देशाने पेंच अभयारण्याच्या सिल्लारीगेट परिसरातील अमलतस सभागृहात बैठक झाली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.दिलीप पाटील- भुजबळ, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार तसेच सावनेर, काटोल आणि रामटेकचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक अधिकारी उपस्थित होते. तसेच मध्य प्रदेशातून जबलपूर झोनचे पोलीस महानिरीक्षक अनिल कुशवाह यांच्यासह सिवनी, छिंदवाडा आणि पांढुर्णा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.

डॉ. इटनकर यांनी यावेळी सादरीकरण केले. ते म्हणाले, रामटेक विधानसभा मतदारसंघातील ९ गावे, काटोल विधानसभा मतदारसंघातील ११ गावे आणि सावनेर विधानसभा मतदारसंघातील १६ गावांच्या सीमांना मध्यप्रदेशातील सिवनी, छिंदवाडा आणि पांढुर्णा जिल्ह्याच्या सीमा लागल्या आहेत. विधानसभा निवडणूक काळात सर्व निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी या सीमावर्ती जिल्हा व पोलीस प्रशासनाकडून उचित समन्वय सहकार्य मिळावा असेही ते म्हणाले. त्यांनी जिल्ह्यातील अवैध रेती उपसा रोखण्यासाठी प्रशासनाने उभारलेल्या चेक पोस्ट, गोवंश तस्करी रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना, बनावट रॉयल्टी व मादक पदार्थांच्या तस्करी संदर्भातील माहितीचेही सादरीकरण केले. हर्ष पोद्दार यांनी फरार आरोपी, अवैध अग्निशस्त्र, विविध गुन्ह्यांमध्ये फरार गुन्हेगार आदी संबंधी सादरीकरण केले व सीमावर्ती जिल्ह्यांच्या पोलीस प्रशासनाकडून सहकार्य व समन्वयाची अपेक्षा व्यक्त केली.

डॉ.दिलीप पाटील-भुजबळ आणि अनिल कुशवाह यांनी उभय राज्यांच्या पोलीस विभागाकडून आगामी विधानसभा निवडणूक काळात माहितीच्या आदान- प्रदानासह उचित समन्वय राखण्याची ग्वाही देत निवडणूक प्रक्रिया शांततेत व कायदा सुव्यवस्था राखून यशस्वी करण्यात येईल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला. उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे यांनी आभार मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सभागृहाला नाव देणे हा ताराचंद हिकरे यांच्या कर्तृत्वाचा गौरव

Wed Aug 28 , 2024
– माढेळी येथे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली भावना चंद्रपूर :- ताराचंद हिकरे सोन्याच्या हृदयाचे नेते होते. हिकरे यांच्यासारख्या नेत्यांनी निःस्वार्थ पक्षप्रेम आणि राष्ट्रभक्ती केली. त्यांनी आपले संपूर्ण जीवन पक्षासाठी समर्पित केले. माढेळीतील सभागृहाला त्यांचे नाव देणे म्हणजे त्यांच्या कार्यकतृत्वाचा गौरव आहे, अशा भावना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!