आरोग्य केंद्राचे आयोजन
अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आरोग्य केंद्राच्यावतीने विद्यार्थींकरीता नि:शुल्क हिमोग्लोबीन तपासणी शिबिर व औषध वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अधक्षस्थानी प्र – कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे, प्रमुख अतिथी म्हणून मुलींच्या वसतीगृहाच्या वार्डन डॉ. मनिषा कोडापे, आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता थोरात, लोखंडे व्यासपीठावर उपस्थित होते.
शिबिरात 175 विद्यार्थीनींनी सहभाग घेतला. 155 विद्यार्थीनींची हिमोग्लोबीनची तपासणी करुन त्यांना मल्टीव्हीटॅमिन टॉनिकचे वितरण प्र – कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. स्मिता थोरात यांनी हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे होणा-या आजाराबाबत सविस्तर माहिती दिली. महिलांनी आपल्या आरोग्याविषयी जागरुक रहावे. वेळोवेळी आरोग्य तपासणी करुन घ्यावी. दिलेल्या टॉनिकचे विद्यार्थीनींनी वेळीच सेवन करावे जेणेकरुन ज्यांचे हिमोग्लोबीन कमी आहे, त्यांना त्याचा लाभ होईल, असा सल्ला आरोग्य अधिकारी डॉ. थोरात यांनी दिला.
डॉ. मनिषा कोडापे यांनीही पालेभाज्या, बिट आदि नैसर्गिक आहाराचे विद्यार्थीनींनी सेवन करावे, असे सांगितले.
अध्यक्षीय भाषणातून प्र – कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे यांनी आयोजित उपक्रमाची प्रशंसा केली. आजच्या स्पर्धेच्या युगात आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावे, असे सांगितले. आभारप्रदर्शनाने शिबिराची सांगता करण्यात आली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी लोखंडे, पाटील, आरोग्य परिचर सचिन काळापुरे, राधिका धोत्रे, शर्मा यांनी परिश्रम घेतले.