– आरोग्य संकल्प अभियान : रोगनिदान, शस्त्रक्रिया, उपचार व औषधी वाटप
यवतमाळ :- राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून दिग्रस-दारव्हा-नेर विधानसभा मतदारसंघात आरोग्य संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत रविवार, ९ जून रोजी दिग्रस येथील दिनबाई विद्यालयात सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया, उपचार व औषध वाटप शिबिर होणार आहे.
माँ आरोग्य सेवा समिती, यवतमाळ, दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालय, सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या या आरोग्य संकल्प अभियानात कर्करोग, रक्तदाब, किडनीचे आजार, हृदयरोग, नेत्ररोग, हायड्रोसिल, हर्निया, मूळव्याध, पोटाचे विकार, थायरॉईड, स्तनाचा कर्करोग, मासिक पाळीतील आजार, अस्थिरोग, कान-नाक-घसा, श्वसन रोग, दंत रोग, मेंदूविकार, मानसिक रोग, बालरोग आदींची मोफत तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया व औषधी वाटप करण्यात येणार आहे. या शिबीरात तज्ज्ञ डाक्टरकडून तपासणी करण्यात येणार आहे. स्तनांच्या कर्करोगासंदर्भात मेमोग्राफी तपासणी, प्लास्टिक सर्जरी, वंधत्व समुपदेशन, व्हेरिकोज व्हेन तपासणी करण्यात येणार आहे. भरती केलेल्या रूग्णांच्या आवश्यक चाचण्याही मोफत करण्यात येणार आहे. या शिबिरात सहभागी रूग्णांना अतिविशेष उपचार व सुविधाही मिळणार आहेत. रूग्णांची नोंदणी शिबिर स्थळावरच केली जाणार आहे. आरोग्य तपासणी शिबिरात येताना रूग्णांनी आधारकार्ड, रेशनकार्ड आणावे. तसेच या शिबिरात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.