मच्छिमार कल्याणकारी महामंडळे ही मच्छिमारांच्या उन्नतीची सुरुवात – सुधीर मुनगंटीवार

– सागरी आणि भूजलाशयीन मच्छिमार कल्याणकारी महामंडळांना मंत्रीमंडळाची मान्यता

मुंबई :- नव्याने स्थापन होत असलेली दोन मच्छिमार कल्याणकारी महामंडळे ही मच्छिमारांच्या सर्वांगीण उन्नतीची सुरुवात आहे, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. “सागरी मच्छिमार कल्याणकारी महामंडळ” आणि “भूजलाशयीन मच्छिमार कल्याणकारी महामंडळ” अश्या दोन नवीन महामंडळांच्या स्थापनेस आज राज्य मंत्रीमंडळाने मान्यता दिली असून, या वेगवान आणि संवेदनशील निर्णयाबद्दल ना. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत. या दोन महामंडळांच्या स्थापनेचा शासन निर्णयही जारी करण्यात आला असून विविध मच्छिमार संघटनांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

या नवीन मच्छिमार कल्याणाकारी महामंडळांबद्दल बोलतांना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की भाजपा शिवसेना राष्ट्रवादी महायुतीचे हे शासन जनतेच्या आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी प्रतिबद्ध आहे. मत्स्यव्यवसाय हे रोजगार देणारे एक मोठे क्षेत्र आहे, आणि या क्षेत्राकडे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनेही अधिक लक्ष पुरवले आहे. राज्यातील ७२० किमि ची सागरी किनारपट्टी, राज्यभर पसरलेले हजारो तलाव, विदर्भातील हजारो मालगुजारी तलाव, धरणांचे तलाव यांनी राज्य समृद्ध आहे. त्यामुळे भूजल आणि सागरी मासेमारी दोन्ही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करतात. हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह मत्स्यव्यवसायावर चालतो. मासे म्हणजेच प्रथीनयुक्त आहाराचा पुरवठा समाजाला मच्छिमार बांधव करीत असतो. राज्याच्या खाद्य संस्कृतीसोबतच सामाजिक संस्कृतीही मच्छिमार बांधव समृद्ध करतात. दुर्दैवाने मच्छिमार बांधवांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. वादळ त्सुनामी सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे मच्छिमार बांधवांचे अतोनात नुकसान होत असते. नावांचे व जाळ्यांचे, इतर उपकरणांचे नुकसान आर्थिक संदर्भातही मोठे असते. तसेच जीवावरही बेतू शकते.

सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की, या क्षेत्राकडे आमच्या पूर्वीच्या कॉंग्रेस सरकारांनी पूर्ण दुर्लक्ष केले होते. मच्छिमार बांधवांना सोयी सुविधा, प्रशिक्षण, आरोग्य सुविधा, विमा संरक्षण, नवीन तंत्रज्ञान, पतपुरवठा अशा सर्व क्षेत्रात दुर्लक्षित केले गेले. मात्र भाजपा महायुतीच्या सरकारने (राज्यातील आणि केंद्रातीलही) मच्छिमार बांधवांच्या समस्या सोडविण्याचा ध्यास घेतला आहे. अनेक प्रलंबित प्रश्नांवर व मागण्यांवर आम्ही यापूर्वीच निर्णय घेतले आहेत. मात्र मच्छिमार बांधवांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे सर्वांगीण कल्याण साधण्यासाठी महामंडळ असले पाहिजे असे आम्हाला वाटले. त्याप्रमाणे मी दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून असे महामंडळ निर्माण करण्याची आवश्यकता मांडली होती. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, आणि अजित पवार यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आज राज्याच्या मंत्री मंडळाने “सागरी मच्छिमार कल्याणकारी महामंडळ” आणि ”भूजलाशयीन मच्छिमार कल्याणकारी महामंडळ” अशी दोन महामंडळे निर्माण करण्यास मंजुरी दिली. राज्याच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्राकरता हा ऐतिहासिक क्षण आहे, असेही ते म्हणाले.

सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की, आता या महामंडळांच्या माध्यमातून मच्छिमार बांधवांना नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, प्रक्रीया उद्योग प्रशिक्षण, आरोग्य योजना अशा कल्याणकारी योजना वेगाने राबवता येतील. भूजलाशयीन आणि सागरी मच्छिमारीचे प्रश्न वेगळे असल्याने दोन वेगळी महामंडळे निर्माण केली आहेत. मच्छिमार कुटुंबे आता उन्नतीकडे वाटचाल करू लागतील, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 59 प्रकरणांची नोंद

Sat Oct 5 , 2024
– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. शुक्रवार (04) रोजी शोध पथकाने 59 प्रकरणांची नोंद करून 34,200/- रुपयाचा दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी रस्ता फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी थुंकणे (रु. 200/- […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com